नरेंद्र मोदी यांची ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ ही दपरेक्ती किती पोकळ आहे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या अनेक उदाहरणांतील एक म्हणजे प्रकाश मेहता. महाराष्ट्राचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता हे व्यवसायजन्य गल्लाकेंद्रित उत्पन्न वगळता सामाजिक, राजकारणादी अन्य कशासाठी विख्यात आहेत असे नाही. विनोदी जाणिवेसाठी तर नाहीच नाही. परंतु तरीही त्यांनी गतसप्ताहात विनोद केला.

विविध घोटाळ्यांत त्यांचे नाव प्रकर्षांने पुढे येऊ  लागल्यावर हे मेहता म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास मी निश्चित राजीनामा देईन. असे विधान करून मेहता हे अलीकडच्या काळातील काही अन्य अशा विनोदी राजकारण्यांच्या पंगतीत येऊन बसले. विरोधकांना हाताशी धरून पक्षातील एखाद्या मंत्र्याचा पत्ता कापणे राजकारणात सुरूच असते. यापूर्वीही तसे झाले आहे. पाहुण्याच्या वहाणेने विंचू मारणे असा एक वाक्प्रचार मराठीत आहे. राजकारणात त्याचे रूपांतर विरोधकांच्या वहाणेने सहकारी मारणे असे होते. मेहता यांचेही असेच होणार हे निश्चित. पक्षासाठी नाही तरी स्वत:च्या प्रतिमेसाठी तरी देवेंद्र फडणवीस यांना प्रकाश मेहता यांना घालवावेच लागेल, असे मत ‘विरोधकांच्या वहाणेने..’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

या स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी भाष्य करायचे असते. या आठवडय़ाकरिता ‘विरोधकांच्या वहाणेने..’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते.