‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये महिलांच्या मंदिरात प्रवेशाबाबत मत मांडण्याची संधी
मंदिरात महिलांना प्रवेशबंदीमागील अतार्किकता मान्य करण्याऐवजी पुरुषांनाही गाभाऱ्यात बंदी घालणे म्हणजे सुधारणेचे एक पाऊल टाकण्याऐवजी दोन पावले मागे येणे. मंदिरप्रवेशाच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर हा प्रश्न मिटणे आवश्यक होते. मात्र, आमच्या धार्मिक अधिकारांत हस्तक्षेप करण्याचा अधिकार न्यायपालिकेस दिला कोणी, असा काही जणांना प्रश्न पडला असून देशाच्या अलीकडच्या इतिहासात या प्रश्नाची मुळे सापडतील. या मुद्दय़ावर थेट भाष्य करणाऱ्या ‘देव पहाया कारणे’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये त्यांचे मत मांडण्याची संधी मिळणार आहे.
मानवाची बौद्धिक क्षितिजे दिवसागणिक रुंदावत असताना कोणाला शनी या ग्रहाऐवजी त्या नावाच्या देवात अधिक रस असेल तर ती बाब हास्यस्पद ठरते.
अशा वेळी महिला व पुरुषांनी या भेदभावकारक ठिकाणी डोके टेकवायची गरज नाही. ही प्रागतिकता बाजूला ठेवून पुरुषांप्रमाणे आम्हालाही दर्शन घ्यायचा हक्क हवा, असे महिला वर्गास वाटत असेल तर ते दोघांतील बौद्धिक ऱ्हासाचेच दर्शन घडवते. या वातावरणात कोणाही उपटसुंभाला नेतृत्वगुण सिद्ध करण्याची संधी मिळते. या वेळीही ती दिसून आल्याचे या अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहे. या आठवडय़ाच्या ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये विद्यार्थ्यांना याच
विषयावर आपली भूमिका मांडायची आहे.
वैचारिक निबंधलेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या लेखन स्पर्धेचा हा नववा लेख आहे.
आर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद आदी विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला.
राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या निर्भीड लेखणीला वाट करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विद्यापीठांची व महाविद्यालयांचीही मोलाची साथ लाभली आहे. त्यामुळे समाजातील महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

लक्षात ठेवावे असे..
* प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते.
* मते नोंदविण्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत.
* indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळावर स्पर्धेतील सहभागासंबंधी माहिती उपलब्ध.
* ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते.
* नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉगइन करून विद्यार्थ्यांना आपली भूमीका मांडता येते.
* किमान २५० शब्द व मराठीतील लेखनाचाच स्पर्धेसाठी विचार केला जाईल.
सहभागी होताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.