शाहरुखच्या सुरक्षेसंदर्भात सुरू असलेल्या वादावर पडदा पाडताना, तो मुंबईत सुरक्षित आहे. त्याची सुरक्षा काढून घेण्यात आलेली नाही, असे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांचे आठ हवालदार शाहरुखच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. २००८ साली शाहरुखला इंडियन मुजाहिदिनकडून धमकीचे ईमेल आल्यानंतर त्याला ही सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर शाहरुखला आता सुरक्षेची गरज नाही, असा अहवाल आल्यावर पोलिसांनी १५ दिवसांपूर्वी ही सुरक्षा काढून घेतली असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मंगळवारी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सत्यपाल सिंग यांनी या वृत्ताचा इन्कार करत त्याची सुरक्षाव्यवस्था कायम असल्याचा खुलासा केला आहे.