तब्बल आठ तास रखडलेल्या शिर्डी पॅसेंजरच्या संतप्त प्रवाशांनी अंबरनाथ स्थानकाजवळ केलेल्या रेलरोकोमुळे बुधवारी सकाळी मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे कोलमडून पडली. त्यातच आंदोलन करणाऱ्या प्रवाशांपकी एका तरुणीला व तिच्या भावाला रेल्वे पोलिसांनी बेदम मारहाण केल्याने या गोंधळात अधिक भर पडली. हे आंदोलन शांतपणे हाताळण्याऐवजी पोलिसांनी केलेल्या दंडेलीमुळे रेलरोकोपायी वैतागलेल्या प्रवाशांच्या संतापात अधिक भर पडली.
मीरा रोड येथे राहणारी धारा ठक्कर (वय २६) आणि तिचा भाऊ चंद्रेश ठक्कर (२४) आपल्या आजारी व वृद्ध आईला घेऊन शिर्डीला गेले होते. तेथून त्यांनी मंगळवारी रात्री शिर्डी पॅसेंजर गाडी पकडली. मूळातच चार तास उशिरा सुटलेली ही गाडी सकाळी आठ वाजता अंबरनाथ स्थानकाजवळ रखडली. या वेळी पाठीमागून येणाऱ्या उपनगरी गाडय़ा पुढे सोडल्या जात असल्याचे पाहून पॅसेंजरमधील प्रवाशांचा संताप अनावर झाला व त्यांनी रूळावर उतरून रेल रोको करण्याचा प्रयत्न केला. या प्रवाशांमध्ये धारा व तिचा भाऊ चंद्रेश हेदेखील होते. धारा लोकलच्या रूळावर आडवी पडली. यावेळी तिला रेल्वे पोलिसांनी समजावून पॅसेंजर गाडीमध्ये बसवले. थोडय़ा वेळाने गाडी सुरू झाल्यानंतर धारा, चंद्रेश आणि त्यांची आई प्रवास करत असलेल्या पॅसेंजर गाडीच्या एस-७ डब्यात रेल्वे पोलीस चढले व धारा व चंद्रेशला पकडून नेऊ लागले. याला या दोघांनी विरोध करताच या दोघांनाही मारहाण करण्यात आली व कल्याण स्थानकात उतरवण्यात आले. तेथेही या दोघांना पोलिसांनी मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. विशेष म्हणजे, यावेळी महिला पोलीस उपस्थित असताना एका पुरुष पोलिसाने धाराला मारहाण व धक्काबुक्की केली, असे एका प्रवाशाने सांगितले. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून धारा व चंद्रेशला अटक करून कल्याण न्यायालयात हजर केले असता दहा हजारांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी त्यांना १३ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणीस हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पॅसेंजर गाडी बराच वेळ रखडल्याने प्रवाशांचा संताप होणे स्वाभाविक होते, मात्र पोलिसांनी हे प्रकरण शांतपणे हाताळण्याऐवजी तरुणीला मारहाण केल्याबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तसेच पोलीस मारहाण करत असतानाची छायाचित्रे काढणाऱ्या एका तरुणासही मारहाण करण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले.
लोकलसेवेचे तीन तेरा
पॅसेंजरच्या प्रवाशांनी केलेल्या रेलरोकोमुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कर्जतहून निघालेल्या ८.४५ वाजताच्या लोकलसमोर झालेल्या या आंदोलनानंतर कोलमडलेली रेल्वेची सेवा अर्धा तास रखडली होती.
या गोंधळामुळे रेल्वेच्या १९ गाडय़ा रद्द कराव्या लागल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला.