भारतातच हिंदूंना संपविण्याची भाषा केली जाते. हिंदुची तीर्थस्थाने उडविण्याच्या धमक्या दिल्या जातात. अल्पसंख्यांकासाठी आरक्षणे मागितली जातात. अशा वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखविलेल्या हिंदुत्वाच्या वाटेवरूनच वाटचाल करण्याचा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला आहे. बुधवारी बाळासाहेबांच्या जन्मदिनी सेना भवनात झालेल्या पक्ष प्रतिनिधींच्या मेळाव्यात, पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सर्वांना हिदुत्वरक्षणाची शपथ दिली.
हिंदूुत्वाच्या मुद्दय़ावरून शिवसेनाप्रमुखांना काही काळ मतदानाचा अधिकार गमवावा लागला होता तर सेना आमदार रमेश प्रभू यांची निवडणूक रद्दबातल ठरली होती. यापुढे मात्र कोणतीही किंमत मोजावी लागली तरी हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार सेनेने केला आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जेथपर्यंत प्रवास केला आहे त्यापुढे एक पाऊल आपण टाकू, असा विश्वास नव्यानेच शिवसेना पक्षप्रमुख बनलेल्या उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार, व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दर पाच वर्षांनी होणाऱ्या या प्रतिनिधी सभेत हिंदुत्व रक्षणाबरोबरच चार ठराव मंजूर करण्यात आले.
यात महाराष्ट्राच्या जनतेवर कर्जाचा डोंगर करून ठेवणारे आणि भ्रष्टाचारग्रस्त काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला सत्तेवरून खाली खेचणे, भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढणे तसेच महिलांचे संरक्षण करण्याचा समावेश आहे.
हिंदुत्व रक्षणाची वाट कितीही बिकट असली तरी शिवसेना हिंदू रक्षणासाठी ठामपणे उभी राहील असे प्रतिनिधी सभेच्या ठरावात नमूद केले आहे. शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी हा ठराव मांडला. आमदार विनायक राऊत यांनी त्याला अनुमोदन दिले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन भूमिपुत्रांचे हक्क आणि महिलांच्या सरक्षणाची ग्वाहीही या बैठकीत एका ठरावाद्वारे सेनेने दिली आहे.