नवनियुक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळय़ास पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या उपस्थितीवरून आक्रमक पवित्रा घेणाऱ्या शिवसेनेने अखेर माघार घेतली. पाकिस्तानच्या क्रिकेट संघ व कलाकारांनाही भारतात पाय ठेवू देणार नाही, अशी ‘शपथ’ घेणाऱ्या सेनेने आज, सोमवारी शरीफ यांच्या साक्षीनेच आपल्या मंत्र्याचा शपथविधी उरकण्याचे निश्चित केले. या संदर्भात भाजपने टाकलेला दबाव आणि पहिल्या शपथविधीचा मुहूर्त टाळल्यास मंत्रिपद हिरावले जाण्याची भीती यामुळे शिवसेनेने आपली जुनी ‘शपथ’ मोडल्याचे उघड झाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही या सोहळय़ाला हजर राहणार आहेत.  
मोदींच्या शपथविधी सोहळय़ातील नवाझ शरीफ यांच्या उपस्थितीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेकडून या सोहळय़ावर बहिष्कार टाकण्यात येण्याची चर्चा होती. शिवसेनेचा एकही खासदार या सोहळय़ात मंत्रिपदाची शपथ घेणार नाही, अशीही चर्चा होती. मात्र, देशभरात भाजपमय वातावरण असताना उगाच शपथविधी समारंभावर नाराजीची सावली नको, असे मोदींनी शिवसेना नेतृत्वाला बजावल्याने उद्धव ठाकरे यांनी नमते घेतले. या संदर्भात रविवारी सेनेच्या नेत्यांची एक बैठकही मुंबईत पार पडली. त्यामध्ये शपथविधीला हजर राहण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्धव ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे तसेच शिवसेनेचे सर्व खासदार आणि काही महत्त्वाचे नेतेही उद्याच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार आहेत.