शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेल्या नेत्यांकडे आर्जव

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क स्मृतिस्थळावर हजारोंच्या संख्येने जमणाऱ्या शिवसैनिकांच्या गर्दीच्या निमित्ताने नेत्यांनी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जनसंपर्काची पर्वणी साधून घेतली.

स्मृतिदिनानिमित्त आयोजिल्या जाणाऱ्या कार्यक्रमांना काही कमी पडू नये म्हणून थेट ‘मातोश्री’वरून आदेश आल्यानंतर दादर, वडाळा, परळ, नायगाव, शिवडी येथील शिवसेना नेत्यांनी स्मृतिस्थळाला भेट देणाऱ्या शिवसनिकांसाठी खाण्या-पिण्याची चोख सुविधा केली होती. त्यामुळे, शिवाजी पार्क परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. ठिकठिकाणी पुरी-भाजी, पुलाव-भात केंद्रे उभारण्यात आली होती. भगवे शेले, शिवबंधन, बाळासाहेबांची छायाचित्र असणारे पेन, गंडे, फटकारे-मार्मिक विकणारी दुकाने स्मृतिस्थळाच्या रस्तोरस्ती सजली होती. या वेळी घाटकोपरमधील कार्यकर्त्यांनी भक्ती ते शक्ती िदडीचे आयोजन केले होते. यात बाळासाहेबांची पालखी मिरवणूक कार्यकर्त्यांनी काढली.

सकाळपासून शिवसनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. दुपारी गर्दी थोडी रोडावली. मात्र, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर इच्छुक उमेदवारांना जनसंपर्क वाढवण्यासाठी स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाची आयती संधी मिळाल्यासारखे चित्र होते.

आगामी महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला ‘मोतोश्री’चा आशीर्वाद मिळणार याची गरमागरम चर्चा काही ठिकाणी रंगली होती. अनेक इच्छुक उमेदवार आपली कार्यकर्त्यांसोबतची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसले. तर काही जण येणाऱ्या बडय़ा नेत्यांच्या स्वागतासाठी झटताना दिसले. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना ‘स्मृतिदिन’ चांगलाच पावल्याचे दिसून आले.