भीमा-कोरेगावातील हिंसक घटना आणि मुंबईतील कमला मिल कंपाऊंड जळितकांडावरून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. एवढ्या मोठ्या घटना होऊनही फडणवीस महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे, चिंतेचे कारण नसल्याचे म्हणतात म्हणजे सगळे आलबेल असणारच असा टोला सेनेने लगावला. कमला मिल जळितकांडप्रकरणात मुंबईच्या आयुक्तांवर दबाव आणला जात आहे. आगीचा लोळ विझला असला तरी आरोप-प्रत्यारोपांचा धूर निघत आहे. सरकारकडून या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू आहे व ती चौकशी शांतता, कोर्ट चालू आहेच्या धर्तीवर शांतता, चौकशी चालू आहे, अशा पद्धतीची नाही हे एव्हाना लक्षात आले असेल, असे म्हटले.

‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोस’ मधील आगीने १४ निरपराध्यांचा बळी घेतला. मुंबईतील ५०० हॉटेल-रेस्तराँच्या अनाधिकृत बांधकामांवर पालिका आयुक्तांनी कारवाई सुरू केली. मुख्यमंत्र्यांनी कुणाचीही गय करणार नसल्याचे म्हटल्याने आयुक्तांनी यात हयगय केली नाही. तरीही वन अबव्हचे माल मात्र फरार झाले. सरकारने त्यांना शोधण्यासाठी लाखाचे बक्षीस जाहीर करून मृतांची खिल्ली उडवल्याचा आरोप, सेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून केला. सरकारने या आरोपींना शोधण्याची जबाबदारी जनतेवर टाकल्याची टीका करत सामान्य गुन्हय़ातील सामान्य गुन्हेगारांना पोलीस फरफटत पोलीस ठाण्यात घेऊन जातात. अनेकदा राजकीय विरोधकांची नालबंदी करण्यासाठी व ‘वाल्यां’ना मदत व्हावी म्हणून मंत्री-मुख्यमंत्री पोलीस ठाण्यात फोन करीत असतात, पण कमला मिल जळितकांडातील आरोपी मात्र फरारी झाले.

मुंबईतील किमान १८ ते २० मोठ्या हॉटेलांवर कारवाई करू नये यासाठी राजकीय दबाव होता. हा नुसता दबाव नव्हता तर राजकीय दबाव होता, असा आरोप सेनेने केला. कमला मिल कंपाऊंड जळितकांडाचे गुन्हेगार अद्याप मोकाट कसे व आयुक्तांवर दबावाचे राजकीय दडपण कोण आणीत आहेत याचे उत्तर तेवढे राज्याच्या जनतेला मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.