मुंबईमधील मराठी टक्का घसरत असतानाच आता मराठीची अस्मिता जपणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी राजकीय लाभासाठी छोटे-मोठे रस्ते, चौक आणि तिठय़ांना अमराठी व्यक्तींची नावे देण्याची नवी रणनीती आखली आहे. लवकरच कांदिवलीमध्ये दोन ठिकाणी अमराठी नावाच्या पाटय़ा झळकण्याची शक्यता आहे. मात्र मनसेने त्याविरुद्ध सरसावण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, नामकरणाच्या वादावरून पुन्हा एकदा मनसेने एल्गार पुकारले असून शिवसेना विरुद्ध मनसे आखाडय़ात आमने- सामने येण्याची चिन्हे आहेत.
मुंबईतील छोटे-मोठे रस्ते, चौक, तिठे आदींच्या नामकरणात सर्वच पक्षांच्या नगरसेवकांना प्रचंड रस असतो. अनेक वेळा काही कुटुंबांकडून अथवा संबंधितांकडून आपल्या जवळच्या व्यक्तीचे नाव रस्ता, चौक, तिठय़ाला देण्याचा आग्रह स्थानिक नगरसेवकांकडे धरला जातो. नगरसेवकही मोठय़ा आत्मीयतेने नामकरणाचे प्रस्ताव प्रभाग समितीमध्ये सादर करतात. तेथे मंजुरी मिळाल्यानंतर हे प्रस्ताव सभागृहात एकमताने मंजूर केले जातात. त्यानंतर कार्यक्रमाचा सोपस्कार उरकून संबंधित ठिकाणी नव्या नावांच्या पाटय़ा झळकू लागतात. वास्तविक नामकरण करण्यापूर्वी स्थानिक रहिवाशांच्या सूचना हरकती मागविणे आता गरजेचे बनू लागले आहे. पण त्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. प्रस्तावाला प्रभाग समिती आणि सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर कांदिवलीमधील ९० फुटी रोडवरील सुरभी हॉटेलसमोरील चौकाचे ‘श्री विद्यापती ठाकूर’ असे, तसेच ठाकूर संकुल प्रवेशद्वारासमोरील चौकाचे ‘अनुव्रत चौक’ असे नामकरण करण्यात येणार आहे.
बोरिवलीपाठोपाठ आता लवकरच कांदिवलीमधील रस्त्यांवर अमराठी नावे झळकू लागण्याची चिन्हे आहेत. याची गंभीर दखल घेत मनसेने शिवसेनेचा हा डाव उधळून लावण्याची तयारी सुरू केली आहे. या नामकरणाबाबत पालिकेने सर्व बाबी पालिकेने पूर्ण केल्या आहेत का, त्यासाठी स्थानिक नागरिकांच्या सूचना-हरकती मागविण्यात आल्या होत्या का, ज्यांचे नाव देण्यात आले आहे त्यांचे मुंबई, महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा किंवा अन्य क्षेत्रांमध्ये योगदान आहे का, असे अनेक सवाल मनसेच्या महिला विभाग अध्यक्षा आरती नलावडे-पवार यांनी उपस्थित केले आहेत. याबाबत इतकेच नव्हे तर याविरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात मनसे आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ जणांनी बलिदान दिले. तसेच मुंबईच्या जडणघडणीमध्ये अनेक धुरीणांनी मोलाचे योगदान दिले, परंतु त्यांची नावे रस्त्याला देण्यास सर्वच नगरसेवकांना विसर पडला आहे.