दिल्लीश्वरांसमोर झुकायचे नाही ही शिकवण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. शिवरायांचा आशिर्वाद शिवसेनेबरोबरच राहणार असल्याचे म्हणत, शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या विधानसभा निवडणूक जाहिरातीची खिल्ली उडवली. बोरीवली येथे दसऱ्यानिमित्त आयोजित सभेत शुक्रवारी उध्दव ठाकरे बोलत होते. महायुतीच्या जागावाटपातील गोंधळाचा पाढा वाचून महायुती तोडण्याचा ठपका ठाकरे यांनी भाजपवर ठेवला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टकारभाराने राज्याचे दिवाळे काढल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा यंदा होणार नसल्यामुळे या वर्षी बोरीवलीच्या मैदानावर सभा आयोजीत करण्यात आली. निवडणूक आचारसंहिता असल्याने यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा घेता न आल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. दसरा मेळाव्याची परंपरा शिवसेनेच्या स्थापनेपासूनच चालत आली आहे. मात्र, या वर्षी विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली असल्याने कायद्याच्या चौकटीत राहूनच दसरा मेळावा करण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ठरवले असल्याचे सांगण्यात आले . अनेक शिवसैनिक पंतप्रधान मोदी विरोधी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा विरोधी फलक घेऊन बोरीवलीच्या मैदानात आले होते.