शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आरे कारशेडमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडला विरोध आहे असे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला आमचा विरोध कायम असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्यासोबत काही तज्ञ उपस्थित होते. यावेळी त्यांनी सादरीकरण करत आरेचे महत्त्व पटवून दिले. तिथे सापडलेल्या वन्यजीवांचे फोटो, व्हिडीओ दाखवत आदित्य ठाकरे यांनी मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाचा दावा फेटाळून लावला.

मेट्रोला विरोध नाही मात्र आरे कारशेडला विरोध आहे असं सांगताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईत सुरु असलेल्या कोणत्याही पायाभूत सुविधांच्या कामांना आम्ही विरोध केला नसल्याचं सांगितलं. आम्ही फक्त विरोधाला विरोध करत नाही नाही असं सांगताना तांत्रिक मुद्द्यांवर फक्त चर्चा होत असून वस्तुस्थितीबद्दल कोणीही बोलत नाही अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी बॅकबे, ओशिवरा डेपोचा पर्याय असल्याचंही सांगितलं. “इतकी मनमानी आजपर्यंत कोणीही केलेली नाही. मुंबईकर, न्यायालयाला धमकी दिली जात आहे. आरेला हात लावला तर सहन करणार नाही,” असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला. मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाकडून घोटाळा केला जात आहे का ? अशी शंकाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

#SaveAarey: MMRCL ने पैसे वाचवण्याऐवजी मुंबईकरांना काय हवे याचा विचार करावा: आदित्य ठाकरे

मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे परिसरात कारशेड उभारणे सर्वाधिक सोयीचे असल्याचं सांगितलं आहे. कारशेडसाठी आरेऐवजी कांजूरमार्गचा प्रस्ताव पुढे केला जात असल्याच्या मुद्यावर त्यांनी हे मत व्यक्त केले. “मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे परिसरात कारशेड उभारणे सर्वाधिक सोयीचे आहे. ही कारशेड अन्यत्र हलवावी लागली तर, हा प्रकल्पच पूर्ण होऊ शकणार नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.

‘आरेमधील जागा ही मेट्रो -३ च्या कारशेडसाठी सर्वात सोयीस्कर जागा असून, मेट्रोचे सर्व संचलन या ठिकाणी करणे शक्य आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला तरी आरे कॉलनीत छोटा कार डेपो करावा लागणार आहे. अन्यथा मेट्रो वाहतूक सुरळीत राहू शकणार नाही,’ असे त्या म्हणाल्या. “कांजूरमार्गची जमीन मिळण्यात सरकारला अडचणी येत असून तेथे कारशेड उभारणे ही किचकट प्रक्रिया आहे. तसेच आरेमधील झाडे तोडल्यानंतर त्याबदल्यात २३ हजार ८४६ झाडे लावण्यात येतील,” असेही त्या म्हणाल्या.

तर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी ‘शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा शहराचा आत्मा आहे. त्यामुळे त्याच्या सक्षमीकरणासाठी मेट्रो गरजेची आहे. मेट्रोमुळे प्रदुषणाच्या पातळीत मोठी घट होणार असून तोडलेल्या झाडांपेक्षा अधिक प्रमाणात कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे,’ असे सांगितले.