काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन दिल्याप्रमाणे, कितीही खर्च आला तरी अरबी समुद्रातच छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य व अद्वितीय स्मारक उभारण्यास आघाडी सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. स्मारकासाठी सुमद्रातील जागाही निश्चित करण्यात आली आहे. पुढील महिन्यात केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करुन स्मारकाच्या कामाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राजभवन, गिरगाव चौपाटी व नरिमन पॉईंट समोरील १६.५ हेक्टरची जागा निश्चित केली आहे. हा खडकाळ भाग असल्याने स्मारकाच्या मजबुतीकरणाच्या दृष्टीने ही जागा योग्य आहे, असा अभिप्रायही दिला आहे. मंत्रिमंडळात त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जगातील अद्वितीय व भव्य असे हे स्मारक होणार आहे. त्यासाठी काही वेळ लागेल. समुद्रात स्मारक उभारायचे असल्याने काही काही तांत्रिक तपासण्या कराव्या लागतील. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा पर्यावरणाच्या मान्यतेचा आहे. त्यासंदर्भातील पत्रव्यवहार केंद्राशी सुरु केला आहे. २ एप्रिलला केंद्रीय पर्यावरण मंत्री मुंबईत येणार आहेत, त्यावेळी त्यांच्याशी सर्वपक्षीय नेत्यांबरोबर चर्चा घडवून आणली जाईल. पर्यावरणाची परवानगी लवकरात लवकर मिळावी, यादृष्टीने आपले प्रयत्न राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. स्मारकासाठी कितीही खर्च करण्याची सरकारची तयारी आहे, परंतु हा भावनेपेक्षा तांत्रिकदृष्टय़ा अधिक आव्हानात्मक प्रकल्प आहे, त्यामुळे सर्वानीच त्यासाठी संयम राखावा व सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.