मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) माजी विद्यार्थ्यांनी संस्थेला साडेसहा कोटींची आर्थिक मदत देऊन ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. संस्थेत विशेष उपक्रम राबविण्यासाठी १९९० मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी हा निधी संस्थेला दिला.
संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी संस्थेच्या विकासाला हातभार लावणाऱ्या चार माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रमोद चौधरी, अशोक कलबाग, राजेश राधाकृष्णन आणि अभय सावंत यांचा समावेश होता. यापैकी चौधरी यांनी संस्थेने केलेल्या गौरवामुळे मला नवी ऊर्जा मिळणार आहे, अशी भावना व्यक्त करत संस्थेला एक कोटींची मदत दिली. यावर्षीच्या सोहळय़ात २५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९०मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी संस्थेला साडेसहा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून माजी विद्यार्थ्यांनी ठरविलेले उपक्रम राबविले जाणार आहेत. यात २००३ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना व त्यांच्या जोडीदाराला वैद्यकीय खर्चासाठी ‘निवृत्त कुटुंब निरोगी निधी’ उभा केला जाणार आहे. तसेच तरुण शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यात तीन वष्रे काम केल्यानंतर त्या शिक्षकांना चार लाख रुपये दिले जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे एखाद्या उत्पादनाची संकल्पना असेल त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ‘कल्पकता निधी’ उभा केला जाणार आहे. तर संस्थेचा संकुल हरित करण्यासाठी विशेष निधी ठेवण्यात येणार आहे. यात पवई तलावाच्या स्वच्छतेसह संकुल परिसराचे सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शेकडो माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी संस्थेचे संचालक डॉ. देवांग खक्कर, माजी विद्यार्थी विभागाचे अधिष्ठाता प्रा. रवी सिन्हा हे उपस्थित होते.
दिवसभर सुरू असलेल्या या मेळाव्याच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांसह वसतिगृह भेट यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या संस्थेने आम्हाला पुस्तकी अभ्यासाबरोबरच समाजभानही शिकविले. यामुळे तब्बल २५ वर्षांनी संस्थेत परतल्यावर पुन्हा ते जुने दिवस डोळय़ासमोर आले. संस्थेने आम्हाला जे काही दिले त्याची परतफेड म्हणून आम्ही काही प्रकल्प हाती घेणार असून त्यासाठी निधीही उपलब्ध करून देणार आहोत.
– संदीप अस्थाना, १९९० मध्ये उत्तीर्ण झालेले
आयआयटीचे माजी विद्यार्थी