‘झोपडपट्टी पुनर्वसन’ योजनेअंतर्गत बांधलेल्या इमारतीमधील सदनिकेत वास्तव्यासाठी जाणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना वाहनतळ सुविधेपासून वंचित राहावे लागत असून त्यांना आपली वाहने रस्त्यावरच उभी करावी लागत आहेत. ‘झोपडपट्टी पुनर्वसन’ योजनेत उभ्या राहणाऱ्या इमारतीतच मुळ रहिवाना आपली वाहने उभी करता यावी यादृष्टीने वाहनतळ सुविधा उपलब्ध करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी नगरसेवकांनी पालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे मुद्दा उपस्थित केला आहे.

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी अनेक भागात ‘झोपडपट्टी पुनर्वसन’ योजनेअंतर्गत उंच इमारती बांधण्यात येत असून झोपडपट्टीधारकांना या इमारतींमध्ये मोफत सदनिका देण्यात येत आहे. ‘झोपडपट्टी पुनर्वसन’ योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या इमारतीमधील वाहनतळामध्ये आठ मुळ रहिवाशांमागे एक वाहन उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात येते. त्यामुळे मुळ रहिवाशांमध्ये वाद निर्माण होण्याची चिन्हे अधिक असतात.

झोपडपट्टय़ांतील मुळ रहिवाशांच्या वाहनांचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘झोपडपट्टी पुनर्वसन’ योजनेअंतर्गत इमारत बांधताना त्यामध्ये वाहनतळाची व्यवस्था करावी. या योजनेतील इमारतीत वास्तव्यास येणाऱ्या मुळ रहिवाशांना स्वत:ची वाहने तेथील वाहनतळात उभी करता यावी अशी व्यवस्था करावी. त्यासाठी किमान दोन सदनिकांमागे एक वाहन उभे करण्यासाठी वाहनतळात जागा उपलब्ध करण्याची तरतूद नियमामध्ये करावी, अशी मागणी करणारी ठरावाची सूचना नगरसेवकांनी पालिका सभागृहात सादर केली आहे.

मुळ रहिवाशांच्या वाहनांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये आवश्यक ते बदल करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेतल्यास  मुळ रहिवाशांच्या वाहनांसाठी पुरेशी जागा असलेल्या वाहनतळाची सुविधा देणे शक्य होऊ शकेल, असे पालिका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.