राज्य वीज नियामक आयोगाने २०१३-१४ या वर्षांसाठी अपारंपरिक स्रोतांपासून तयार होणाऱ्या विजेचे दर जाहीर केले असून नवीन दरपत्रकामुळे साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पात तयार होणारी युनिटमागे वीज एक रुपया दोन पैशांनी महाग, तर सौरऊर्जा २.१८ रुपयांनी स्वस्त झाली आहे. पावसाळय़ातील काही दिवस वगळता वर्षभर छान सूर्यप्रकाश असणाऱ्या महाराष्ट्रात सौरऊर्जेच्या विकासाला त्यामुळे चालना मिळणार आहे.
राज्य वीज नियामक आयोगातर्फे दरवर्षी अपारंपरिक स्रोतांपासून तयार होणाऱ्या विजेचे दर जाहीर केले जातात. सौरऊर्जेच्या दरात कपात करून दिलासा देणाऱ्या वीज आयोगाने साखरसम्राटांनाही खूश केले आहे. साखर कारखान्यांतील सहवीजनिर्मिती प्रकल्पांत चिपाडापासून तयार होणाऱ्या विजेचा दर प्रति युनिट ४.७९ रुपये होता. तो आता एक रुपया दोन पैशांनी वाढवून प्रति युनिट ५.८१ रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे साखर कारखानदारांना चांगलाच लाभ होणार आहे. तसेच या वाढीव दरामुळे त्याचा बोजा राज्यातील वीजग्राहकांवर पडणार आहे.
पवनऊर्जेचा दर सध्या ५.६७ रुपये प्रति युनिट इतका होता. तो आता १४ पैशांनी वाढून ५.८१ रुपये प्रति युनिट इतका झाला आहे. लघू जलविद्युत प्रकल्पांतील विजेचा दर चार रुपये ७६ पैसे प्रति युनिट इतका होता. तो आता चार रुपये ९२ पैसे प्रति युनिट इतका करण्यात आला आहे. तर बायोमासपासून तयार होणाऱ्या विजेचा दर पाच रुपये ४१ पैसे प्रति युनिट इतका होता. तो आता पाच रुपये ८७ पैसे प्रति युनिट इतका करण्यात आला आहे.

वीजमागणी १५ हजार मेगावॉटवर!
राज्यात उन्हाळय़ाच्या झळा तीव्र होत असल्याने विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत असून राज्यातील वीजमागणीने १५ हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला आहे. २५ मार्च रोजी राज्यात १५०७३ मेगावॉट इतकी वीजमागणी नोंदवली गेली. ती २०१२-१३ या आर्थिक वर्षांतील सर्वोच्च वीजमागणी ठरली आहे. नुकतीच ती १४ हजार ७२९ व नंतर १४ हजार ७८८ मेगावॉटपर्यंत पोहोचली होती. आता वीजमागणीने १५ हजारांचा टप्पा ओलांडला