19 April 2019

News Flash

नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनामुळे कल्पनाशक्तीला बहर

‘वाचनामुळे एखाद्या गोष्टीकडे किंवा प्रसंगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात खूप फरक पडतो.

सोनिया परचुरे नृत्य दिग्दर्शिका

‘वाचनामुळे एखाद्या गोष्टीकडे किंवा प्रसंगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात खूप फरक पडतो. माझ्या वाचनाची सुरुवात लहानपणी चंपक, किशोर अशी बालमासिके आणि ‘रीडर्स डायजेस्ट’मुळे झाली. याच ‘रीडर्स डायजेस्ट’मधील कोडय़ांमुळे, त्यातील विज्ञानविषयक माहितीमुळे मला विज्ञानविषयक कथा वाचण्याची आवड निर्माण झाली. या कोडय़ांमुळे आणि पुस्तकांमुळे माझ्यातील संयम वाढण्यास खूप मदत झाली. वाचन हे माझ्यासाठी एका जिवलग मित्रासारखे आहे. वेगवेगळ्या पुस्तकांच्या वाचनामुळे आपली कल्पनाशक्ती वाढण्यास खूप मदत होते. याच कल्पनाशक्तीचा उपयोग मला आता नृत्य दिग्दर्शन करताना होतो.

माझ्या वडिलांमुळे मला वाचनाची सवय लागली. माझे वडील दिवसाला शंभर पाने वाचत. शिवाय आम्हाला विविध पुस्तके वाचायला आणून देत. वडिलांचे वाचन पाहून मीसुद्धा हळूहळू त्यांनी आणलेली पुस्तके वाचायला लागले. मला प्रामुख्याने ‘नॉट विदाउट माय डॉटर’, ‘रणांगण’ यांसारख्या कादंबऱ्या, श्रीराम लागू लिखित ‘लमाण’, आचार्य अत्रेंचे ‘कऱ्हेचे पाणी’, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘काळे पाणी’ यांसारखी विविध क्षेत्रांतील नामवंतांची चरित्रे वाचायला खूप आवडतात. माझ्या घरात सध्या विविध विषयांवरची पाचशे ते साडेपाचशे पुस्तके आहेत. निवांतपणे पुस्तक वाचण्यासाठी मी रात्रीची वेळ निवडते, कारण रात्रीच्या शांततेत पुस्तक वाचण्याची मजा काही और आहे.  महाविद्यालयीन दिवसांत मी सिडने शेल्डन यांचे ‘गॉन विथ द विंड’, पु.ल. देशपांडे यांची ‘बटाटय़ाची चाळ’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ अशी सगळी पुस्तके मी वाचली. मराठी भाषा व भाषेची काठिण्य पातळी उत्कृष्टरीत्या समजून घेण्यासाठी आचार्य अत्रेंची सगळी पुस्तके

आवडीने वाचली.  चिं.वि. जोशी, जयवंत दळवी, वि.स. खांडेकर यांची पुस्तके वाचायलाही मला आवडतात.

नृत्य क्षेत्रात असल्याने डॉ. पुरुदादरिच यांचे पुस्तक, तीर्थरम आझाद यांचे ‘कत्थक दर्पण’, रोहिणी ती यांचे ‘लहेजा’, डॉ. मंजिरी देव यांचे ‘नृत्यसौरभ’ अशी अनेक नृत्यावर आधारित पुस्तके मी वाचली. या पुस्तकांच्या यादीत एक नर्तिका व कोरिओग्राफरच्या आयुष्यावर बेतलेल्या इझा डोरा डंकन यांच्या पुस्तकाचा विशेष उल्लेख करावा लागेल. या पुस्तकातून उत्स्फूर्तपणे किंवा ‘बियाँड द बॉन्ड्री’ म्हणजेच एका चौकटीच्या बाहेर जाऊन नृत्य कसे करावे हे मी शिकले. ज्या वेळी मला नृत्यामध्ये महाभारतातील द्रौपदी रंगवायची होती, त्या वेळी मी ‘याज्ञसेनी’ वाचले. संत सूरदास यांचे काव्य, ‘भगवद्गीता’ आणि ‘ज्ञानेश्वरी’ मी वाचलेले आहेत. ‘ज्ञानेश्वरी’ व ‘गीतरामायण’ यांसारखे ग्रंथ मी बॅले या नृत्य प्रकारामध्ये दिग्दर्शित करून जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. याचे फळ म्हणजे माझ्या क्लासमधील एका ५ वर्षांच्या मुलाला आज ‘गीतरामायण’ तोंडपाठ आहे.

पुस्तकांच्या शेअरिंगबाबत माझा माझ्या मुलीशी सर्वात जास्त संबंध येतो. माझ्या मुलीमुळे मला आता सत्यकथासुद्धा वाचायला आवडतात. तसेच नव्या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांची ओळखही तिच्यामुळेच मला झाली. माझ्या नृत्याच्या क्लासमधील विद्यार्थ्यांबरोबरसुद्धा मी पुस्तकांची खूप देवाणघेवाण करते. जे पुस्तक मी वाचले असेन, त्या पुस्तकाबद्दल मी माझा दृष्टिकोन विद्यार्थ्यांना समजावते. ‘गीतारहस्य’ आणि ‘दासबोध’ हे दोन महान ग्रंथ माझ्याकडून जेव्हा हरवले, त्या वेळी खूप वाईट वाटले होते. जे काही आपण वाचतो, त्यातला आपल्याला आवडलेला भाग आपण लिहून ठेवायचा आणि या वाचनाचा उपयोग आपल्या दररोजच्या बोलण्यात, लिहिण्यात आला पाहिजे, असे मला वाटते. प्रिय अशा पुस्तकांविषयी मी एक नक्की सांगेन,

तैलात रक्षेत जलात रक्षेत।

रक्षेत शिथिल बंधनात।

मूर्ख हस्तेन दातव्यं।

एवम् वदति पुस्तकम् ।

First Published on August 10, 2017 2:55 am

Web Title: sonia parchure dance director bookshelf