अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी मुंबईतल्या सत्र न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोलीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप निश्चित केला आहे. न्यायाधीश केडी शिरभाटे यांनी आयपीसीच्या कलम ३०६ अंतर्गत पांचोलीवर आरोप निश्चित केले आहेत. याप्रकरणी १४ फेब्रुवारीपासून सत्र न्यायालयात साक्षीदारांची तपासणी सुरु होणार आहे.

आरोपपत्रानुसार, जिया खान ३ जून २०१३ रोजी तिच्या घरी फासावर लटकलेली आढळली होती. त्याच्या दोन दिवस आधी ती सूरजच्या घरीच राहिली होती आणि ३ जून रोजी सकाळी तिच्या घरी परतली होती. तर सीबीआयच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान सूरजने तथ्य लपवले आणि पॉलीग्राफ किंवा ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यासही नकार दिला.

जिया खानने ३ जून २०१३ रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी जियाचा कथित प्रियकर सूरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. मात्र, तो जामिनावर सुटला होता. जुलै २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली होती. याप्रकरणी सूरजवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोपपत्र सीबीआयने दाखल केले होते.