26 January 2021

News Flash

राणीबागेतील पक्ष्यांची विशेष काळजी

दिवसातून तीन वेळा तपासणी; बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे मुंबई महापालिके च्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय आणि उद्यानामधील (राणीची बाग) पक्षी विहारातील पक्ष्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. या पक्ष्यांचे दिवसातून तीन वेळा डॉक्टरांमार्फत निरीक्षण करण्यात येणार  आहे. उद्यानातील पक्ष्यांचा बाहेरून येणाऱ्या पक्ष्यांशी अजिबात संपर्क येणार नाही, याची विशेष काळजी घेतली जात आहे.

महाराष्ट्रासह देशातील दहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई, ठाणे परिसरातही अनेक पक्षी, कावळे, कोंबडय़ांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी चेंबूरमध्येही नऊ कावळे मृतावस्थेत आढळले होते. त्यापैकी दोन पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यामुळे सरकारी यंत्रणा दक्ष झाल्या आहेत. राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग आणि महापालिका यांच्या समन्वयाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता नियमावली जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या सूचनांचे राणीच्या बागेतील संचालकांनी पालन करावे, अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत. त्यानुसार राणीच्या बागेतील पक्ष्यांची विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

करोनाचा प्रसार झाल्यापासून प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची विशेष काळजी दररोज घेतली जात आहे. दररोज एकदा पक्ष्यांची तपासणी केली जातेच. पण आता बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांची दिवसातून तीन वेळा तपासणी केली जात असल्याची माहिती संचालक संजय त्रिपाठी यांनी दिली. डॉक्टर आणि पिंजऱ्यातील साहाय्यक (प्राणीपाल) यांच्या मदतीने ही तपासणी केली जाते. तसेच पिंजऱ्यांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण यावरही विशेष भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. राणीच्या बागेतील पक्षी पिंजरे हे बंदिस्त स्वरूपातील असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या पक्ष्यांशी त्यांचा संपर्क येण्याची शक्यता नाही, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुक्त पक्षी विहार

राणीच्या बागेत विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी भव्य पिंजरा तयार करण्यात आला आहे. देशातील पहिलेच भव्य मुक्त पक्षी विहाराचे लोकार्पण जानेवारी २०२० मध्ये करण्यात आले होते. मुक्त पक्षी विहार हे दालन ४४ फू ट उंच आणि १८ हजार २३४ चौरस फू ट क्षेत्रफळात तयार करण्यात आले आहे. यामध्ये बजरीगर, क्रौंच, हॅरोननाइट, पेलीकन, करकोचा, सारस, मकाव असे २०० हून अधिक देशी-परदेशी पक्षी आहेत. मात्र हे पक्षी दालन लोकांसाठी खुले करण्यापूर्वीच टाळेबंदी लागू झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 12:02 am

Web Title: special care for the birds in the rani bagh abn 97
Next Stories
1 करोनामुक्त आरोग्य कर्मचाऱ्यांचेही लसीकरण गरजेचे
2 करोनाकाळात नालेसफाईसाठी जुन्याच कंत्राटदारांना काम
3 परदेशी नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक
Just Now!
X