मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरारी आर्थिक गुन्हेगार आणि हिरे व्यापारी नीरव मोदी याचा मेहुणा मयांक मेहता याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवल्यावर विशेष न्यायालयाने त्याच्याविरोधातील सगळी वॉरंट मंगळवारी रद्द केली.

मेहता हा मंगळवारी हजर झाल्यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांनी त्याच्याविरोधात आतापर्यंत बजावलेली सगळी वॉरंट रद्द केली. तसेच त्याला ५० हजार रुपयाच्या व्यक्तिगत मुचलका मंजूर केला. त्याचवेळी त्याला देशाबाहेर जायचे असल्यास न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, अशी अटही घातली. त्याला मेहता याच्या वकिलांनी विरोध केला.  अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) चौकशीसाठी बोलावण्यात आल्यावर तो हजर होईल. त्यामुळे या अटीची आवश्यकता नसल्याचेही मेहताच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

आपण भारतात पाऊल ठेवताच आपल्याला अटक होईल, अशी भीती मेहता दाम्पत्याने व्यक्त केली होती. न्यायालयाने त्यांना अटक केली जाणार नाही, अशी हमी दिल्यावर दोघेही भारतात यायला तयार झाले. परंतु त्यानंतर केवळ मयांक भारतात आला आणि त्याने ईडीसमोर जबाब देण्याची व तपासात सहकार्य करण्याची तयारी दाखवली.

झाले काय ?

मेहता आणि त्याची पत्नी हे पूर्वी या प्रकरणी आरोपी होते. मात्र दोघांनी नंतर या प्रकरणी माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दाखवली. परंतु त्याबदल्यात आपल्याविरोधातील सगळी अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. फेब्रुवारी २०२१ मध्ये मेहता दाम्पत्याने वॉरंट रद्द करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतरही न्यायालयाने त्यांच्याविरोधातील वॉरंट रद्द केले नव्हते. एप्रिल महिन्यात अजामीनपात्र वॉरंटचा निर्णय न्यायालयाने प्रलंबित ठेवला होता. तसेच दोघेही घोटाळ्यात कोण गुंतले होते, घोटाळा कसा झाला यासह घोटाळ्याशी संबंधित संपूर्ण आणि खरी माहिती देतील या अटीवरच त्या दोघांना न्यायालयाने माफीचा साक्षीदार बनवण्यास परवानगी दिली होती.