रसिकलाल दोषी या ८० वर्षीय क्रिकेटप्रेमीने बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांना पत्र लिहून मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल यांच्यामध्ये १५ मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएल सामन्याच्या तिकिटाचे पैसे परत देण्याची मागणी केली आहे.
दोषी यांनी आठ तिकिटांसाठी एकूण २० हजार रूपये मोजले होते. मुंबई इंडियन्सला प्रोत्साहन देण्य़ासाठी दोषी यांनी आपल्या कुटुंबियांसाठी गरवारे स्टॅंडची एकूण आठ तिकिटे तब्बल वीस हजार रूपयांनी खरेदी केली होती. १६ मे रोजी श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक झाल्यानंतर दोषी यांनी तिकिटाचे पैसे परत देण्याची मागणी केली आहे.
ही चोरी असून, आम्ही कमावलेल्या घामाच्या पैशातून बुकी चंगळ करत असल्याचे दोषी म्हणाले.
गेली ५९ वर्षे दोषी हे कायदेतज्ञ म्हणून काम करत आहेत. तिकिटांचे पैसे परत न मिळाल्यास बीसीसीआयच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. स्पॉट फिस्किंग प्रकरणानंतर आमचे पैसे पाण्यात गेल्याची खंत दोषी यांनी व्यक्त केली आहे.
स्फॉट फिक्सिंग हा फसबणुकीचा प्रकार असून त्याविरोधात आपला अधिकार आपम वापरणार असल्याचे दोषी म्हणाले. दोषी यांनी याआधी अनेक क्रिकेट सामने पाहिले असले तरी, १५ मे रोजी झालेल्या आयपीएलच्या सामन्याला त्यांनी पहिल्यांदाच उपस्थिती लावली होती.