भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बुधवारी करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनात मुंबईत पहिली झळ उपनगरीय रेल्वेला बसली. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर झालेल्या आंदोलनामुळे रेल्वेचे प्रवासी उत्पन्नच बुडाले आहे. दोन्ही रेल्वेचे मिळून ३ कोटी ३८ लाखाहून अधिक उत्पन्न बुडाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. याचबरोबर एसटी महामंडळालाही आर्थिक फटका बसला असून हा आकडा २० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.

मध्य रेल्वेवर सकाळी पावणे आठ तर पश्चिम रेल्वे मार्गावर बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून विविध रेल्वे स्थानकात आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनाची तीव्रता सकाळी दहानंतर अधिक होत गेली. पश्चिम रेल्वेच्या पालघर, विरार, नालासोपारा, दहिसर, मालाड, एल्फिन्स्टन, दादर स्थानकात आंदोलनकर्त्यांकडून रेल रोको करण्यात आला. त्यामुळे लोकल सेवांवर त्याचा परिणाम झाला. महत्त्वाची बाब म्हणजे आंदोलनामुळे सर्वाधिक परिणाम मध्य रेल्वेवरच झाला. मध्य रेल्वे हार्बर मार्गावर चेंबूर, गोवंडी स्थानकात तर वारंवार आंदोलन करण्यात आले होते. मुख्य मार्गावरही दादर, घाटकोपर, विक्रोळी यासह अन्य स्थानकात रेल रोको करण्यात आले.

२१७ बसेसची मोडतोड

भीमा कोरेगावच्या घटनेमुळे झालेल्या आंदोलनात एसटीला २० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. दोन दिवसांत २१७ बसची मोडतोड केल्याने सुमारे एक कोटी रुपये आणि २५० पैकी २१३ आगारांतील वाहतुक ठप्प झाली. त्यामुळे १९ कोटी रुपयांचा महसुल बुडाला आहे. २१७ बस काही दिवस धावू शकणार नसल्याने एसटीला महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.

मालवाहतुक रखडली

मध्य रेल्वे मार्गावर होणारी मालवाहतुकही होऊ शकली नाही. त्यामुळे एका दिवसाचे चार कोटी रुपयांचा महसुल बुडाल्याचे सांगितले.

कांजुरमार्ग स्थानकाचे नुकसान

बुधवारी आंदोलनकर्त्यांकडून मध्य रेल्वेवरील कांजुरमार्ग स्थानकाची सुविधांचीही तोडफोड केली. यामध्ये आठ सीसीटिव्ही कॅमेरा, चार इंडिकेटर्स, दोन डिजीटल घडय़ाळ, दहा टय़ूबलाईट फोडतानाच पाण्याची मशिन, बॅनरही फडाण्यात आले. त्याचप्रमाणे दोन स्टीलचे कचऱ्याचे डबे तोडतानाच दोन डबे चोरीला गेल्याची माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. डोंबिवली स्थानकातही दोन खिडक्यांच्या काचांचे नुकसान झाले आहे.