साध्या व निमआराम गाडय़ांसाठी १० टक्के; शिवनेरी सेवेसाठी २० टक्के अधिक पैसे मोजावे लागणार

दिवाळी, उन्हाळी सुटय़ा, ख्रिसमस अशा सुटय़ांच्या मोसमात वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन या संधीचे सोने करण्यासाठी एसटी महामंडळाने यंदाच्या दिवाळी सुटय़ांमध्ये हंगामी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी वाहतूकदारही या मोसमात अव्वाच्या सव्वा भाडेवाढ करून वाहतूक करतात. मात्र तेवढे दर न वाढवता साध्या व निमआराम बसगाडय़ांच्या तिकीट दरांत १० टक्के आणि शिवनेरीच्या दरांमध्ये २० टक्के एवढी दरवाढ झाली आहे. महामंडळाच्या संकेतस्थळावर दिवाळीच्या काळातील गाडय़ांचे आरक्षण करण्याचा प्रयत्न केला असता हे नवे दर दिसत आहेत. विशेष म्हणजे ही दरवाढ केवळ दिवाळीच्या सुटीपुरतीच लागू असेल.

राज्य सरकारच्या गृह विभागाकडून २००६मध्ये एक अधिसूचना काढण्यात आली होती. या अधिसूचनेनुसार वातानुकुलित गाडय़ांसाठी ३३ टक्के आणि साध्या गाडय़ांसाठी १५ टक्के एवढय़ा मर्यादेत दरवाढ करण्याचे अधिकार महामंडळाला देण्यात आले होते. २०१४मध्ये राज्य परिवहन प्राधिकरणाने या निर्णयात बदल करत गर्दीच्या कालावधीत ३० टक्के जास्त आणि कमी गर्दीच्या हंगामात ३० टक्के कमी असे दर बदलण्याची सवलत दिली होती.

या निर्णयाचा आधार घेत गेल्या वर्षी दिवाळीत एसटी महामंडळाने साध्या व निमआराम गाडय़ांच्या दरांत १० टक्के आणि वातानुकुलित गाडय़ांच्या दरांमध्ये २० टक्के दरवाढ केली होती. या निर्णयामुळे गेल्या वर्षी एसटी महामंडळाला ४३ कोटी रुपयांचे जादा उत्पन्न दिवाळीच्या काळात मिळाले होते. त्याचाच आधार घेत एसटी महामंडळाने यंदाही दिवाळीच्या काळात १० आणि २० टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुटय़ांच्या कालावधीत मुंबई-पुणे वातानुकुलित प्रवासासाठी प्रवाशांना ८० ते १०० रुपये जादा मोजावे लागणार आहेत.