‘लोकासांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण’ या उक्तीचा प्रत्यय मंत्रालयातील मुख्य सचिवांसह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील जनतेला आणून दिला आहे. भोगवटा प्रमाणपत्र घेतल्याशिवाय (ओसी) घरात राहणे बेकायदा ठरविणाऱ्या राज्य शासनाच्या सचिवांनी मात्र चक्क मंत्रालयातच वापर परवाना न घेता अलिशान कार्यालयातून आपला कारभार सुरू केल्याचे उघडकीस आले आहे.
गेल्या वर्षी मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर संपूण मंत्रालयाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय राज्य शानाने घेतला. त्यानुसार वरील तीन मजल्यांच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. हे नूतनीकरण करत असतानाच मंत्रालयाच्या इमारतीमध्ये मोठय़ा प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर मूळ सहा मजली इमारतीवर आणखी एक मजला चढविण्यात आला आहे. हे सर्व बदल करत असताना त्याचे आराखडे महापालिकेकडून मंजूर करून घेऊन प्रमाणे अन्य आवश्यक परवानग्याही घेण्यात आल्या.
वरील तीन मजल्यांच्या नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून तेथे सोमवारपासून मुख्य सचिम जयंतकुमार बांठिया, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अमिताभ राजन, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे,सचिव  मुखर्जी यांची कार्यालये सुरू झाली आहेत. या सर्व अधिकाऱ्यांनी नव्या कार्यालयातून आपला कारभार सुरू केला असला तरी प्रत्यक्षात मात्र नूतनीकरण करण्यात आलेल्या या मजल्यांना महापालिकेने वापर परवाना दिला नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
याबाबत महापालिकाआयुक्त सीतीराम कुंटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो असे उत्तर दिले. मात्र त्यानंतर सातत्याने संपर्क साधूनही ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत. तर मुख्य सचिव बांठिया यांच्याशी संपर्क साधला असता, नूतनीकरण करण्यात आलेल्या मजल्यांवर कार्यालये सुरू झाल्याचे त्यानी मान्य केले. मात्र वापर परवान्याबाबत माहिती घेतो, असे सांगून या विषयावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.
दरम्यान मंत्रालयातील नूतनीकरण केलेल्या या कार्यालयांना ‘ओसी’ मिळालेली नसल्याचे लक्षात आल्यानंतर रात्री उशिरा महापालिका आयुक्त कुंटे, मुख्य सचिव बांठिया आणि अन्य अधिकाऱ्यांमध्ये मंत्रालयात खलबते सुरू होती, अशी माहितीही सूत्रांनी दिली.