तिरोडा येथील ‘अदानी पॉवर’चा ६६० मेगावॉटचा दुसरा संच आणि अमरावतीमधील ‘इंडिया बुल्स’चा २७० मेगावॉटचा संच सुरू झाला असून येत्या ८-१० दिवसांत दोन्ही संचांमधून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे राज्याला जवळपास ८०० मेगावॉट वीज मिळणार असून बाजारपेठेतून होत असलेली वीजखरेदी कमी होईल.
तिरोडा येथील ‘अदानी पॉवर’च्या वीजप्रकल्पातून १३२० मेगावॉट विजेसाठी दीर्घकालीन वीजखरेदी करार करण्यात आला आहे. तर ‘इंडिया बुल्स’सह अमरावतीमधील प्रकल्पातून ८१० मेगावॉट विजेसाठी करार झाला आहे. त्यानुसार ‘अदानी’चा पहिला संच उन्हाळा सुरू होत असताना कार्यान्वित झाला. ‘इंडिया बुल्स’चाही वीजसंच दोन महिन्यांपूर्वी सुरू झाला होता. पण दुष्काळ व पाण्याचा विषय निघाल्याने स्थानिक कारणांमुळे तो बंद पडला. आता ‘इंडिया बुल्स’चा संच पुन्हा एकदा सुरू झाला आहे. तर ‘अदानी’चा दुसरा संच सुरू झाला आहे.
राज्यातील वीजमागणी सध्या सुमारे साडेतेरा हजार मेगावॉट असून भारनियमनाचे प्रमाण अवघ्या ६० ते ८० मेगावॉटपर्यंत आले होते. राज्यातील विजेची मागणी भागवण्यासाठी अल्पकालीन कराराद्वारे बाजारपेठेतून सुमारे ५६४ मेगावॉट वीज घेतली जात आहे. तर केंद्रीय कोटय़ातून गरजेनुसार तीनशे ते चारशे मेगावॉट वीज खेचली जाते.