मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’मध्ये करण्यात आलेली वाढ त्वरीत रद्द करण्यात आली नाही तर १ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने दिला आहे.
मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये वाढ करण्यात आली असून १ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही वाढ अन्याय्य असून त्यामुळे मालवाहतूकदारांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष बाल मलकित सिंग यांनी सांगितले. ही वाढ त्वरित मागे घेण्यात यावी अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले.
रस्ते वाहतूक करणाऱ्या वाहनांना उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, डिझेलच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणून त्याचा दर संपूर्ण देशात एकच ठेवण्यात यावा, राष्ट्रीय परवाना असलेल्या वाहनांना टोल परवाना देण्यात यावा, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांप्रमाणेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसनाही राष्ट्रीय परवाना देण्यात यावा, पासपोर्टप्रमाणे आरसी बूकचेही केंद्रीकरण करण्यात यावे आदी मागण्या सरकारने मान्य कराव्यात अन्यथा १ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.