जल्लोशकर्त्यांच्या सुरक्षेसाठी प्रथमच कडक बंदोबस्त
नववर्षांच्या पूर्वसंध्येला साजरा केला जाणारा जल्लोश निर्विघ्नपणे पार पडावा, महिलांनाही त्यात सहभागी होता यावे म्हणून पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने यंदा प्रथमच मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दल, पोलीस, राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन निवारण दल, पालिकेचे सुरक्षारक्षक, जीवरक्षक असा ताफा समुद्रकिनाऱ्यांवर सज्ज राहणार आहे.
पावसाळा आणि सार्वजनिक सुट्टीच्या निमित्ताने समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळपासून चौपाटय़ांवर करण्यात येणार आहेत.
नववर्षांच्या स्वागतासाठी चौपाटय़ा अधिक सुरक्षित बनाव्यात यादृष्टीने पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत प्रथमच काळजी घेण्यात येणार आहे. अग्निशमन दलाचा एक बंब आणि सात-आठ अग्निशामक, चार-पाच जीवरक्षक, राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन निवारण दलाचे आठ जवान, पालिकेचे १० सुरक्षारक्षक, पाच-सहा पोलीस, तसेच आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील कर्मचारी असा ३० जणांचा फौजफाटा प्रत्येक चौपाटीवर तैनात करण्यात येणार आहे. गिरगाव, दादर, जुहू, मढ, आक्सा, गोराई आदी चौपाटय़ांवर ही मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मुंबईतील सर्व यंत्रणांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षात उपस्थित राहणार आहेत. पालिकेच्या विभाग कार्यालयांना,
रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जल्लोशाच्या नादात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही मंडळी समुद्रकिनाऱ्यांवर काळजी घेणार आहेत.
३१ डिसेंबर रोजी ठिकठिकाणी पाटर्य़ा, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत असल्याने समुद्रकिनाऱ्यांवर चेंगराचेंगरीचे प्रकार घडू शकतात. तसेच मद्याच्या धुंदीत असलेले अनेक तरुण आनंदाच्या भरात समुद्रात उतरतात. त्यामुळे दुर्घटना घडू शकते. तसेच गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोर हातसफाई करीत असतात. महिलांची छेडछाड, तसेच मोबाइल, दागिने, पाकीटमारीचे अनेक प्रकार या वेळी चौपाटय़ांवर घडतात. या सर्व प्रकारांना आळा बसावा आणि केवळ आनंदोत्सव साजरा व्हावा या उद्देशाने आपत्कालीन व्यवस्थापन विभाग काळजी घेणार आहे.