‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले’ ही उक्ती कृतीतून सार्थ करणारे, जातपात न मानणारे व मराठी माणसामध्ये स्वाभिमानाचे बाळकडू पाजणारे शिवसेनाप्रमुख खऱ्या अर्थाने योद्धय़ासारखे जगले. शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र यावी हे त्यांचे स्वप्न हयातीत पूर्ण झाले. उभयपक्षातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र आलेली ही शक्ती अभेद्य ठेवून वृद्धिंगत करण्यावर भर दिल्यास तीच खरी शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार रिपाइं (आठवले गट) चे माजी रायगड जिल्हाध्यक्ष, विद्यमान नगरसेवक मोहन औसरमल यांनी २१ नोव्हेंबर रोजी, खोपोलीतील श्रीराम मंगल कार्यालयात, नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या सर्वपक्षीय शोकसभेत बोलताना काढले. शिवसेना, भाजप, शेकाप, मनसे, रा. काँ., भारतीय काँग्रेस इत्यादी पक्षांतील महिला व पुरुष कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार या प्रसंगी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. १९८२ पासून आपण शिवसेनेमध्ये निष्ठेने कार्यरत आहोत. संसार सांभाळून शिवसेनेचे कार्य करा, असा वडीलकीच्या नात्याने महिलांना सल्ला देणारे शिवसेनाप्रमुख महान होते. त्यांनी सदैव महिलांचा आदर केला. त्यागमय जीवनाची त्यांनी दिलेली शिकवणूक आचरणात आणल्यास तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती – सेनेच्या महिला आघाडीप्रमुख अनघा कानिटकर यांनी या प्रसंगी काढले. शिवसेनाप्रमुख मनाचे व विचाराचे श्रीमंत होते. मराठी माणसाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य, सर्वपक्षीयांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून पुढे नेल्यास तीच त्यांना सर्वपक्षीयांची खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार मनसे मध्य रायगड जिल्हाध्यक्ष मनीष खवळे यांनी काढले.
२० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण कृतीत उतरविणारे शिवसेनाप्रमुख केवळ शिवसेना कार्यकर्त्यांचे नेते नव्हते, तर ते सर्व देशवासीयांचे प्रेरणा व स्फूर्तिस्थान होते. म्हणूनच त्यांना सर्व पक्षांचे नेते मानत होते. देशभक्त बाळासाहेब ठाकरेंच्या निधनामुळे भारतीय राजकारणात निर्माण झालेली पोकळी कदापिही भरून निघणार नाही, अशी भावना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष मधुकर दळवी यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केली. शिवसेनाप्रमुखांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तो आचरणात आणणे, हीच त्यांना दिलेली श्रद्धांजली ठरेल, असे त्यांनी शेवटी स्पष्ट सांगितले. शिवसेनाप्रमुखांनी मराठी अस्मिता जोपासताना जातपात, धर्माला थारा न देता सच्चे शिवसैनिक घडविले. या महान नेत्याच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झालेला आहे, अशी खंत शेकापचे खोपोली शहर चिटणीस सूर्यकांत देशमुख यांनी व्यक्त केली. बाळासाहेबांचे अधुरे कार्य पुढे नेटाने नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.
शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका प्रिया जाधव, भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. राजेंद्र येरुणकर, पत्रकार रवींद्र घोडके यांनी त्याला दुजोरा दिला. थोर साहित्यिक कै. र. वा. दिघे यांच्या स्नुषा साहित्यिका, कवयित्री उज्ज्वला दिघे यांनी स्वरचित काव्यातून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्राच्या व राज्याच्या समाजकारणात कसे धाडसाने बोलले पाहिजे याचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या शिवसेनाप्रमुखांचा भगवा झेंडा सर्वसामान्यांचा आधार आहे. बाळासाहेबांनी शिवसैनिक घडविले. पदाची, सत्तेची अभिलाषा न बाळगता अव्याहत समाजासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचे विचार आचरणात आणणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर यांनी काढले.
शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष किसन शेलार या प्रसंगी अतिशय भावविवश झाल्यामुळे काहीच बोलू शकले नाहीत. दरम्यान, शोकसभा सुरू होण्यापूर्वी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलशाचे दर्शन खोपोलीकरांना घडविण्यात आल्यानंतर अस्थिकलश पेणकडे रवाना करण्यात आला. शेवटी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.