शैलजा तिवले

करोना संसर्गामुळे कानातील रक्तवाहिन्यांवर परिणाम झाल्याने अचानक काही अंशी बहिरेपणा येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या घटना दुर्मीळ असल्या तरी संसर्गादरम्यान किंवा बरे झाल्यानंतर रुग्णांना कानाशी संबंधित समस्या जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी अधोरेखित केले आहे.

करोना संसर्गामुळे कानाच्या रक्तवाहिन्यांमध्येही गुठळ्या झाल्याने अचानक बहिरेपणा (सडन सेन्सरीन्युरल हिअरिंग लॉस) आल्याच्या घटनाही नोंदल्या आहेत.

करोनाची तीव्र लक्षणे असलेल्या ३५ वर्षीय पुरुषाला तीन आठवडे अतिदक्षता विभागात उपचार घेतल्यावर घरी सोडले. त्यानंतर आठवडाभराने उजव्या कानाने ऐकू येणे पूर्ण बंद झाले. तर सौम्य लक्षणे असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीलाही करोना उपचारादरम्यान काही अंशी बहिरेपणा आला होता, अशी माहिती वोक्हार्ट रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. केदार तोरस्कर यांनी सांगितले.

कानाच्या आतील बाजूच्या एका  भागातून ऐकू येते आणि दुसरा भाग तोल सावरण्याचे कार्य करतो. ऐकण्याच्या भागातील रक्ताभिसरणावर परिणाम झाल्यास बहिरेपणा येतो. तोल सावरण्याच्या भागातील रक्ताभिसरण खंडित झाल्यास रुग्णाला चक्कर येते. करोना संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये या दोन्ही तक्रारी आढळल्या आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे संसर्गमुक्त झाल्यावर हा त्रास होत असल्याचे आढळले आहेत, असे नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांनी सांगितले.

कानाच्या आजारांच्या तीव्रतेत झपाटय़ाने वाढ

कानातून पू येणे किंवा तत्सम तक्रारी असलेल्या रुग्णांमध्ये करोना संसर्गानंतर या आजारांची तीव्रता झपाटय़ाने वाढल्याचे आढळले आहे. कानाच्या तोल सावरण्याच्या भागावर परिणाम झाल्याने चक्कर येण्याच्या तक्रारी अधिकतर दिसून आल्याचे डॉ. भूमकर यांनी सांगितले.