मुंबईत ‘सनबर्न’ला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर कार्यक्रम होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, मुंबईत नियोजित ठिकाणी उद्या, रविवारी दुपारी ‘सनबर्न’चा कार्यक्रम होणार, असे आयोजकांनी सांगितले असून, फ्रेंच डीजे डेव्हिड गेटाची कॉन्सर्ट होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याने वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) होणारा ‘सनबर्न’चा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. ‘सनबर्न’च्या आयोजकांकडून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नसल्याने परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र, आता ‘सनबर्न’चा कार्यक्रम रविवारी दुपारी होणार असून, फ्रेंच डीजे डेव्हिड गेटाची कॉन्सर्ट होईल. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असून, पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे, असा दावा आयोजकांनी केला आहे.

दरम्यान, कार्यक्रमाच्या आयोजनास विरोध नाही, पण आयोजकांनी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच त्यांना कार्यक्रम घेता येऊ शकतो. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेचीही माहिती त्यांनी पोलिसांना द्यायला हवी होती, असे झोन ८ चे पोलीस उपायुक्त व्ही. मिश्रा यांनी सांगितले होते. रितसर परवानगी नसतानाही जर आयोजकांनी कार्यक्रम घेतला तर, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यांनी आदेशांचे पालन करायला हवे, असेही त्यांनी सांगितले होते.

विशेष म्हणजे, पुण्यातही ‘सनबर्न’ फेस्टिव्हलला मोठ्या प्रमाणावर विरोधाला सामोरे जावे लागले होते. कार्यक्रमाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणीस नकार दिल्याने ‘सनबर्न’चा मार्ग मोकळा झाला होता. पण फेस्टिव्हलच्या आयोजनानंतर आजोयकांवर दंड आकारण्यात आला होता. विनापरवाना डोंगराचे सपाटीकरण केल्याने, सनबर्न फेस्टिव्हलला तब्बल ६२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.