पालिका आयुक्तांचे आदेश; तीन दिवसांत गाळ काढण्याचे आवाहन

मुंबई : नालेसफाईच्या कामाला यावर्षी टाळेबंदीमुळे खूपच विलंब झाला असून मनुष्यबळदेखील कमी आहे. अशा परिस्थितीत नालेसफाईत कोणताही घोळ होऊ नये म्हणून नालेसफाईच्या कामावर ड्रोनद्वारे पाळत ठेवण्यात येणार आहे. नदी-नाल्यांच्या उगमापासून शेवटपर्यंत सफाईच्या कामावर चोख लक्ष ठेवले जाणार आहे.

मुंबईत पावसाळ्यापूर्वी दरवर्षी नालेसफाई क्र मप्राप्त असते. नालेसफाईत काही वर्षांपूर्वी घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. नालेसफाईतून गाळ व्यवस्थित काढला जात नसल्यामुळे मुंबईत दरवर्षी पाणी तुंबत असल्याचेही आरोप होत असतात. त्यामुळे नालेसफाईतील गैरप्रकार रोखण्यासाठी सफाईची छायाचित्रे व ध्वनीचित्रफिती, गाळाचे वजन करणे अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यापुढे जाऊन आता नवनियुक्त महापालिका आयुक्तांनी ड्रोनने नालेसफाईवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ज्या ठिकाणी अपेक्षित नालेसफाई झाली नाही, त्या ठिकाणी तत्काळ पुन्हा तपासणी करून घेतली जाते.

२९  मेपर्यंत पालिका अशा प्रकारे नालेसफाईवर ड्रोनने नजर ठेवणार आहे, अशी माहिती पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत देण्यात आली. ड्रोनने टिपलेल्या माहितीचा अभ्यास करून कोणत्या ठिकाणी नाल्यात गाळ, कचरा जास्त आहे. त्याचाही अंदाज येईल. त्यानुसार पुढील नियोजनही करता येणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी एका कंत्राटदाराने अल्पवयीन कामगार नेमल्याचे व कामगारांना ग्लोवज, मुखपट्टय़ा, गमबुट दिल्या नसल्याचे प्रकारही उघडकीस आले होते. अशा घटनावर देखील नियंत्रण मिळवता येणार आहे.

७० टक्के  गाळ काढल्याचा दावा

मुंबईच्या नाल्यातील ७० टक्के गाळ काढण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मुंबईत २१५ किलो मीटरचे मोठे १५६ किलो मीटरचे लहान नाले आहेत. तर साधारण १हजार ९८६ किलो मिटरचे नाले आहेत. ३१ मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करायची आहे. तर जास्तीत ५ ते ७ जूनपर्यंतची मुदत वाढ मिळू शकते.