22 November 2017

News Flash

‘त्या’ महिलेच्या मृत्यूचे गूढ कायम

कळवा येथील सह्य़ाद्री सोसायटी भागात एका इमारतीच्या गच्चीवरून पडून मृत पावलेल्या ‘त्या’ महिलेचा मृत्यू

प्रतिनिधी, ठाणे | Updated: December 11, 2012 6:22 AM

कळवा येथील सह्य़ाद्री सोसायटी भागात एका इमारतीच्या गच्चीवरून पडून मृत पावलेल्या ‘त्या’ महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, तिच्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याने पोलिसांना या घटनेबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूच्या घटनेबाबत अद्यापपर्यंत सविस्तर असा उलगडा होऊ शकलेला नाही.
कळवा येथील सह्य़ाद्री सोसायटी भागात असलेल्या एका इमारतीत स्वप्निल निक्ते राहतात. स्वप्निल हे संगणक अभियंता असून ते ऐरोली भागातील एका कंपनीत कामाला आहेत. सहा महिन्यांपुर्वीच सई आणि त्यांचे लग्न झाले होते. रविवारी सायंकाळी स्वप्निल आणि सई हे दोघे इमारतीच्या गच्चीवर गेले होते. त्यानंतर दोघेही गच्चीवरून खाली पडल्याची घटना घडली. यात सई यांचा जागीच मृत्यू झाला तर स्वप्निल गंभीर जखमी झाले. या प्रकरणाचा कळवा पोलिसांनी तपासही सुरु केला. मात्र, स्वप्निल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने पोलिसांना या घटनेबाबत सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे दोघे तोल जाऊन खाली पडले की, त्यांनी आत्महत्या केली, याबाबतचा उलगडा अद्याप झालेला नाही. तसेच या घटनेचा घरगुती वादाशी काही संबंध आहे का, या दिशेनेही पोलिसांनी तपास केला. मात्र, त्यामध्ये घरगुती वाद नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या घटनेबाबत वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश निलेवाड यांच्याशी संपर्क साधला असता, या घटनेबाबत सईच्या कुटूंबियांची कोणतीच तक्रार नाही, तसेच त्यांच्या घरात वाद होत नव्हते, असे शेजाऱ्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे या प्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वप्निल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या जबाबानंतरच या घटनेबाबत सविस्तर समजू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

First Published on December 11, 2012 6:22 am

Web Title: suspense of lady death
टॅग Crime,Lady Death