रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नो हाँकिंगबाबत जनजागृती करण्यासाठी आता क्रिकेटपटू सरसावले आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये जनजागृतीसाठी प्रदर्शनीय सामना रंगणार असून या सामन्यात ‘टीम इंडिया’तील शिखर धवन, अजिंक्य राहाणे, के. राहुल, सुरेश रैना, युवराज सिंग, दिनेश कार्तिक असे आघाडीचे क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.

वाहनांचे अपघात आणि वाहनांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ‘नो हॉकिंग’बाबत जनजागृतीसाठी प्रदर्शनीय क्रिकेट सामना होणार आहे. ‘नो हॉकिंग इलेव्हन’ विरुद्ध ‘रोड सेफ्टी इलेव्हन’ या संघात टी-२० सामना होणार असून २४ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील शिखर धवन, अजिंक्य राहाणे, के. राहुल, सुरेश रैना, युवराज सिंग, दिनेश कार्तिक असे आघाडीचे क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.

प्रदर्शनीय सामन्याचे निमंत्रण देण्यासाठी सुनील गावस्कर बुधवारी विधान भवनात गेले.अधिवेशन सुरु असताना क्रिकेटच्या मैदानातील दिग्गज विधान भवन परिसरात आल्याने सर्वांनाच धक्का बसला. मात्र, काही वेळात दोघांच्या या भेटीमागचे कारण स्पष्ट झाले. गावस्कर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या दालनात गेले आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली.