टाटा पॉवर कंपनीच्या एचआर विभागाचे ईमेल आयडी हॅक करून कंपनीतल्याच एका कर्मचाऱ्याविरोधात इतरांना ईमेल पाठवण्यात आल्याचे प्रकरण पवई पोलिसांकडे तपासासाठी आले आहे. तक्रारीच्या ईमेलमध्ये कर्मचारी कंपनीतील महिलांसोबत सातत्याने असभ्य, अश्लील वर्तन करतो, असा दावा करण्यात आला आहे.

कंपनीकडून मिळालेल्या तक्रारअर्जानुसार १२ फेब्रुवारी रोजी प्रथम तीन कर्मचाऱ्यांना असा ईमेल धाडण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कंपनीतील २४ कर्मचाऱ्यांना हाच ईमेल प्राप्त झाला. हे आयडी वापरून व्यवहार करण्याचे अधिकार मर्यादित व्यक्तींना आहेत. मात्र त्यापैकी कोणीच हे ईमेल धाडलेले नाहीत. त्यामुळे ईमेल आयडी हॅक झाल्याचा संशय कंपनीने तक्रारीत व्यक्त केला आहे.