आरोपी विद्यार्थ्यांचे कुटुंब बेपत्ता

शिक्षिकेची हत्या केल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्यांचे कुटुंब गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे शिक्षिकेच्या हत्येमागील हेतू स्पष्ट करण्याचे प्रयत्न खुंटल्याचे आणि कुटुंबाविरोधातील संशय बळावल्याचे पोलीस सांगतात.

गोवंडीतील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या आयेशा हुसईये (३०) परिसरातील उर्दू शाळेत शिकवत आणि खासगी शिकवणी घेत. सोमवारी रात्री शिकवणी आटोपून सर्व विद्यार्थी बाहेर पडल्यावर शेजाऱ्यांना त्यांची किंकाळी ऐकू आली. शेजारी आले तेव्हा शिकवणीला येणाऱ्या सहावीतल्या विद्यार्थ्यांच्या हाती रक्ताने माखलेला चाकू होता, तर आयेशा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेल्या आढळल्या. शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून या विद्यार्थ्यांला ताब्यात घेतले. सध्या हा विद्यार्थी डोंगरी येथील बालसुधारगृहात आहे.

गरीब परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या आईने आयेशा यांच्याकडे उसनी रक्कम मागितली होती. ती आयेशा यांनी नाकारली. सोबत अपमानास्पद शेराही मारला. तो या विद्यार्थ्यांला झोंबला होता. तोच राग मनात ठेवून आयेशा यांची हत्या केल्याचे या विद्यार्थ्यांने पोलिसांना सांगितले आहे.

विद्यार्थ्यांचा हा दावा पडताळून पाहण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांशी संपर्क साधला. तब्येत खालावलेल्या पत्नीसोबत रुग्णालयात आल्याचा बहाणा विद्यार्थ्यांच्या वडिलांनी केला. मात्र त्यानंतर पोलिसांचा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाशी संपर्क होऊ शकलेला नाही. विद्यार्थ्यांचे घर कुलूपबंद असल्याचे पोलिसांना आढळले. शोधाशोध, चौकशी केली असता या कुटुंबाबाबत शेजारी अनभिज्ञ आहेत.

आईच्या चौकशीतून मुलाचा दावा पडताळणे शक्य होईल. त्यासाठी त्यांचा जबाब नोंदवणे आवश्यक आहे. मात्र कुटुंबच बेपत्ता असल्याने तीन दिवसांपासून तपास खुंटला आहे, असे तपासाशी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले.  आईच्या जबाबातून आर्थिक मागणीबाबत विसंगत माहिती पुढे आल्यास अन्य शक्यता, अंदाजांआधारे हेतूबाबत तपास करणे क्रमप्राप्त आहे, असेही त्याने स्पष्ट केले.

दुसरीकडे सुधारगृहाने विद्यार्थ्यांच्या पालकांना २४ सप्टेंबरला हजर ठेवा, अशी सूचना पोलिसांना केली आहे. त्यासाठीही पोलीस या कुटुंबाचा शोध घेत आहेत.

पोलिसांच्या विविध शक्यता

आयेशा यांच्या हत्येनंतर परिसरातील संतप्त जमावाकडून जिवाला धोका आहे, या शक्यतेने हे कुटुंब बेपत्ता झाले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अनुमान आहे. मात्र त्यासोबत आयेशा यांच्या हत्येत कुटुंबाचा अप्रत्यक्ष सहभाग असावा, असा संशयही बळावू लागल्याचे पोलीस सांगतात. या विद्यार्थ्यांला हाताशी धरून आयेशा यांची हत्या करण्यात आली असावी, असा एक अनुमान आहे. आयेशा यांचे वैयक्तिक आयुष्य, काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांची हत्या घडल्यानंतरच्या घडामोडी कारणीभूत असाव्यात, या शक्यताही पोलीस पडताळून पाहात आहेत.