शालेय शिक्षण विभागाने शाळांना वर्षभराचे साधारण वेळापत्रक न दिल्याने आता सुट्टय़ांवरून शिक्षकांचा गोंधळ झाला आहे. शिक्षण विभागाने तातडीने दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी आणि सहामाही परीक्षाबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

शाळांना दिवाळीची साधारण १५ ते २० दिवस सुट्टी असते. त्यापूर्वी शाळा सहामाही परीक्षांचे आयोजन करतात. शिक्षण विभाग याचे वेळापत्रक जाहीर करतो. यंदा मात्र विभागाने वेळापत्रक जाहीर केले नाही. विभागाने १ ते २१ नोव्हेंबर दिवाळीची सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. यंदा ऑनलाइन वर्ग, करोना संशयितांचा शोध, सर्वेक्षण यांमुळे बहुतेक शिक्षकांना उन्हाळी सुट्टी मिळाली नाही. ऑनलाइन वर्गही सलग सहा महिने सुरू आहेत. गणपतीच्या सुट्टीबाबतही गोंधळ झाल्याने काही शाळांनी सुट्टी दिली नाही. त्यामुळे दिवाळीची सुट्टी विभागानेच जाहीर करावी, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. त्याचप्रमाणे सहामाही परीक्षा कधी आणि कशा घ्याव्यात याबाबतही विभागाने सूचना द्यावी, असे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिले आहे.

परीक्षांच्या मूल्यांकनाला विरोध : काही शाळांनी सहामाही परीक्षांचे नियोजन केले आहे. विद्यार्थी आणि पालकांना वेळापत्रकही दिले आहे. सुविधांच्या अभावी शाळांच्या परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेणे अनेक शाळांना शक्य नाही. काही शाळांनी नियमित परीक्षेनुसार प्रश्नपत्रिका काढली आहे. विद्यार्थ्यांनी घरी बसून उत्तरपत्रिका लिहावी आणि त्याचे छायाचित्र शिक्षकांना पाठवावे, अशी सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. शिक्षकांनी उत्तरपत्रिकेची छापील प्रत काढून त्या तपासून द्याव्यात, असे शाळांचे म्हणणे आहे. मात्र, वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांच्या छापील प्रती काढणे त्रासदायक आणि खर्चीक आहे, असे शिक्षकांचे म्हणणे असून शिक्षकांनी अशा परीक्षांना विरोध केला आहे.