News Flash

‘शाळाबाह्य़’ मुलांच्या शोधात शिक्षक!

पालकांचे मोबाइल क्रमांक मिळवण्याचे फर्मान

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

शिक्षण विभागाकडून शिक्षकांसाठी नवे फतवे; पालकांचे मोबाइल क्रमांक मिळवण्याचे फर्मान

शाळाबाह्य़ मुले शोधून ती प्रत्यक्षात शाळेत आणण्यासाठी एका दिवसांत मुलांचे सर्वेक्षण, शाळेत मुलांबरोबर सेल्फी काढणे असे शिक्षण विभागाचे प्रयत्न वारंवार फसल्यानंतर आता ‘प्रत्येक शाळाबाह्य़ मुलाच्या पालकाचे संपर्क क्रमांक मिळवा. पालकांच्या सातत्याने संपर्कात राहा आणि मुलांना शाळेत आणा,’ असे नवे फर्मान शिक्षण विभागाने शिक्षकांवर सोडले आहे. त्याचबरोबर शाळाबाह्य़ मुले शोधण्यासाठी परिसरात फिरण्याची सवय लावून घ्या,’ असाही उल्लेख विभागाच्या एका पत्रात करण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात शाळाबाह्य़ मुलांचा प्रश्न निरुत्तरितच आहे. गेल्या दोन वर्षांपासून मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी आणि शाळाबाह्य़ मुलांना शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभागाने अनेक मोहिमा आखल्या. त्या गमतीदार स्वरूपामुळे चर्चेतही राहिल्या. मात्र शाळाबाह्य़ मुलांची संख्या कमी झालेली नाही.

सध्या वेगवेगळ्या अहवालांचा आधार घेत राज्यात साधारण ४ लाख २० हजार मुले शाळाबाह्य़ असल्याचे शासनानेच कबूल केले आहे. आता पुढील वर्षीच्या शैक्षणिक आराखडय़ात या मुलांची संख्या शून्यावर आणण्याचा उद्देश शिक्षण विभागाने ठेवला आहे. त्यासाठी शाळाबाह्य़ मुलांच्या पालकांचे संपर्क क्रमांक मिळवण्याची सूचना शिक्षण विभागाकडून शिक्षकांना करण्यात आली आहे.

फर्मानाची गोष्ट..

काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाचे एक वरिष्ठ अधिकारी जालना जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी परिसरात फेरफटका मारताना एका पालावर दोन मुले आढळली. अधिकाऱ्यांनी माध्यमांसह सर्व कनिष्ठ अधिकाऱ्यांना जागे केले.

सर्व शिक्षण विभाग कामाला लागला; चक्क दोन मुलांचा शाळेत प्रवेश झाला आणि त्यांच्यावरचा ‘शाळाबाह्य़’ हा शिक्का पुसला गेला. त्यावेळी  शाळाबाह्य़ मुलांच्या पालकांकडे मोबाईल असतो. त्याचा क्रमांक मिळाल्यास मुलांवरील शाळाबाह्य़ हा शिक्का पुसला जाईल या विचारातून या मुलांच्या पालकांचे मोबाईल क्रमांक मिळवण्याचे फर्मान शिक्षण विभागाकडून सुटले आहे. ‘मला शाळाबाह्य़ मुले दिसतात. मग इतरांना का दिसत नाहीत या प्रश्नावर विचार होण्याची गरज आहे,’ अशी तंबीही अधिकाऱ्यांनी शिक्षकांना पत्रातून दिली आहे. शाळाबाह्य़ मुलांचा शोध घेण्यासाठी आठवडय़ातून एकदा शिक्षकांनी त्यांच्या शाळेच्या परिसरात फेरफटका मारावा,’ अशी सूचना पत्रात करण्यात आली आहे.

शाळाबाह्य़ मुलांची संख्या घटण्याचे गुपित 

राज्यात साधारण ४ लाख २० हजार शाळाबाह्य़ मुले आहेत. मात्र त्यातील ३ लाख २२ हजार मुले ही मान्यता क्रमांक नसलेल्या शाळांमध्ये आहेत. त्यामुळे ही मुले शाळाबाह्य़ दिसत आहेत. सध्या अनधिकृत असलेल्या शाळांना यूडीएस क्रमांक मिळाला की शाळाबाह्य़ मुलांची संख्याही कमी दिसेल. शाळाबाह्य़ आणि स्थलांतरित मुलांचे शिक्षण या कार्यात आपण शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत,’ अशा आशयाचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 12:56 am

Web Title: teachers found uneducated students
Next Stories
1 उन्नत प्रकल्प अखेर बासनात
2 शरद पवार यांची मुलाखत राज ठाकरे घेणार!
3 काँग्रेस-राष्ट्रवादीचा मोर्चाद्वारे सलोख्याचा संदेश!
Just Now!
X