विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परीक्षा कामावरील बहिष्कार आंदोलनाचा ३५वा दिवस पदवी महाविद्यालयीन शिक्षकांनी शुक्रवारी आझाद मैदानात मोठय़ा संख्येने ‘जेलभरो’ आंदोलन करून गाजविला. ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’चे नेते सीताराम येचुरी यांनी यावेळी मैदानावर हजेरी लावून शिक्षकांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
राज्य सरकारच्या ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाईच्या इशाऱ्याला न जुमानता विद्यापीठ परीक्षांवर बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय ‘एमफुक्टो’ या प्राध्यापकांच्या राज्यस्तरीय संघटनेने घेतला आहे. आझाद मैदानात जेल भरो आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी शुक्रवारी आपल्या ताकदीची झलक दाखवून दिली.
शिक्षकांना आपल्या मागण्यांसाठी इतका काळ तंगविण्याचा असा प्रकार जगभरात कुठेच झालेला नाही, असे स्पष्ट करून येचुरी यांनी महाराष्ट्र सरकारचा यावेळी निषेध केला. शिक्षकांनी रास्त मागण्यांसाठीच परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. देशातच काय तर जगभरात कुठेच शिक्षकांनी इतका काळ परीक्षेच्या कामावर बहिष्कार टाकलेला नाही. शिक्षकांवर ही वेळ यावी ही महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्याची शोकांतिका आहे, अशी कठोर टीका येचुरी यांनी केली. येचुरी यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय पालक व शिक्षक संघटना यांनीही प्राध्यापकांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला आहे.
एमफुक्टो जिंदाबाद, मुख्यमंत्री आणि राजेश टोपे मुर्दाबाद आदी घोषणांनी दुपारी १२ वाजल्यापासून हे मैदान दणाणून गेले होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आश्वासने जून, २०१२मध्ये झालेल्या एमफुक्टो आणि सरकारमध्ये झालेल्या चर्चेनंतरही देण्यात आली होती. पण, लेखी आश्वासन देऊनही ती नंतरच्या काळात पाळण्यात आली नाहीत. त्यामुळे, दोन दिवसांपूर्वी दिलेल्या आश्वासनाने आमचे बिलकुल समाधान झाले नाही, असे एमफुक्टोचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी स्पष्ट केले.
घोषणाबाजीनंतर प्राध्यापकांनी मैदानाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांनी सर्व प्राध्यापकांना ताब्यात घेतले. प्राध्यापकांना समोरील महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आवारात बसविण्यात आले. थोडावेळ या ठिकाणी बसवून कोणताही गुन्हा दाखल न करता सोडून देण्यात आले.

कारणे दाखवा नोटिशीचा परिणाम नाही.
शासनाकडून प्राध्यापक संघटनेला मागण्यांबाबतच्या निर्णयाचे पत्र देण्यात आले आहे. याबाबत एमफुक्टोचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी सांगितले, ‘‘आज आम्हाला पत्र मिळाले. आम्हाला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेली नाहीत. किंबहुना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री माध्यमांशी परवा जे बोलले, त्यापेक्षाही मिळालेले पत्र अधिक वाईट आहे. या पत्राबाबत संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. मात्र, सध्या हाती असलेले पत्र पाहता बहिष्कार मागे घेतला जाण्याची शक्यता नाही. शासनाने अजून कारवाई सुरू केलेली नाही. कारवाईबाबत काय भूमिका घ्यायची हेही कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ठरेल. शनिवारी सकाळी बैठक होणार आहे. प्राध्यापकांना नागपूर, मुंबई, या विद्यापीठांबरोबर राज्यातील बाकी काही विद्यापीठांनीही कारणे दाखवा नोटीस पाठवल्या आहेत.  ‘विद्यापीठांच्या कुलगुरूंना आणि शासनाला आंदोलनाची कल्पना देणारे पत्र आम्ही ३१ जानेवारीलाच दिलेले आहे. संघटनेचे आदेश आल्याशिवाय काम सुरू केले जाणार नाही,’ असे उत्तर प्राध्यापकांनी या नोटिशीला पाठवले आहे.

९१ पैकी ४४ केंद्रावर परीक्षा नाहीत
प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे शुक्रवारी ९१ पैकी ४४ परीक्षा केंद्रांवर तृतीय वर्ष विज्ञानाच्या (बीएससी) प्रात्यक्षिक परीक्षा पार पाडू शकल्या नाहीत. मुंबई विद्यापीठातर्फे प्राणीशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जैवतंत्रज्ञान, रसायनशास्त्र आणि संगणकशास्त्र या विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षा गेला आठवडाभर सुरू आहेत. परंतु, प्राध्यापकांच्या असहकारामुळे केवळ ४० ते ५० परीक्षा केंद्रांवर प्रात्यक्षिक परीक्षा घेणे विद्यापीठाला शक्य झाले आहे. प्राध्यापकांच्या असहकारामुळे रूपारेल, एमडी, रिझवी, भवन्स, केसी, किर्ती आदी महाविद्यालयांमधील प्रात्यक्षिक परीक्षा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाबरोबरच प्राध्यापकांनी महाविद्यालयीन परीक्षांवरही बहिष्कार टाकल्याने अनेक महाविद्यालयांनी एफवाय व एसवायच्या परीक्षाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत. परीक्षेची तयारी करून गेलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा नेमक्या कधी होणार याची काहीच माहिती महाविद्यालयाकडून देण्यात येत असल्याने विद्यार्थी हवालदील झाले आहेत.