खासदारकीच्या निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी चर्चेत आलेले सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवचार्य यांना गुरुवारी मुंबई हायकोर्टाने तात्पुरता दिलासा दिला. त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या जात पडताळणी समितीच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी होणार आहे.

न्या. के. के. तातेड आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणाची सुनावणी ८ एप्रिलपर्यंत स्थगित करीत प्रतिवाद्यांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. जात पडताळणी समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्याची पुरेशी संधी मिळाली नसल्याचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी कोर्टात सांगितले. त्यामुळे कोर्टाने त्यांना तात्पुरता दिलासा दिला.

हायकोर्टात बाजू मांडताना सरकारी वकिलांनी म्हटले, जयसिद्धेश्वर स्वामी यांना १५ दिवसांचा अवधी देऊनही त्यांनी याबाबतचे पुरावे जात पडताळणी समितीसमोर सादर केले नाहीत. त्यासाठी त्यांनी विविध कारणं देत वेळ मारुन नेली. सुरुवातीला त्यांनी आपलं जात प्रमाणपत्र कोर्टामध्ये जमा असल्याचं म्हटलं होतं. तर काही दिवसांनी केरळमध्ये प्रवासादरम्यान ते हरवल्याचंही सांगितलं होतं. दरम्यान, समितीनं संपूर्ण तपासणीनंतर जयसिद्धेश्वर स्वामी यांचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा निर्णय दिल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टासमोर सांगितलं.

खासदार जयसिद्धेश्वर यांच्या शाळेच्या दाखल्यावर त्यांच्या जातीचा हिंदू लिंगायत असा उल्लेख आहे. मात्र, निवडणुकीच्यावेळी त्यांनी बेडा जंगम जातीचा बनावट दाखला सादर केला होता, अशी तक्रार अपक्ष उमेदवार आणि माजी महापौर प्रमोद गायकवाड यांनी जातपडताळणी समितीकडे केली होती. यानंतर या प्रकरणाची दक्षता समितीमार्फत पडताळणी करण्यात आली यामध्ये जयसिद्धेश्वर स्वामींचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचं सिद्ध झालं. त्याचबरोबर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दक्षता समितीने दिले होते. त्यानंतर सिद्धेश्वर स्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली.