News Flash

‘सारथी’ची ग्रंथखरेदी वादाच्या भोवऱ्यात!

संस्थेचे अध्यक्ष प्रा. मोरे यांचीच बहुसंख्य पुस्तके खरेदी केल्याचा आक्षेप

प्रतिनिधिक छायाचित्र

संस्थेचे अध्यक्ष प्रा. मोरे यांचीच बहुसंख्य पुस्तके खरेदी केल्याचा आक्षेप

उमाकांत देशपांडे, लोकसत्ता

मुंबई : मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थी, तरुणांच्या सहाय्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या पुण्यातील ‘ सारथी ‘ संस्थेची पुस्तक खरेदीही वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे यांचीच बहुसंख्य पुस्तकेही खरेदी केल्याने त्याबाबत शासनस्तरावर आक्षेप (कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) असून याबाबत उच्चस्तरीय चौकशीही होणार आहे. संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार किंवा नियमबा’ काम झालेले नाही. चौकशीत आमची बाजू मांडली जाईल व सत्य पुढे येईल, असे अध्यक्ष प्रा. सदानंद मोरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.

संस्थेतील कामकाजाबाबत शासनस्तरावर झालेल्या प्राथमिक चौकशांमध्ये गैरव्यवहाराचे १६ हून अधिक मुद्दे उपस्थित झाल्याने उच्चस्तरीय सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले आहेत. त्यामध्ये संस्थेने शासनाची कोणतीही मान्यता न घेता सुमारे एक कोटी रुपयांची ग्रंथ खरेदी केल्याने आक्षेप घेण्यात आले आहेत. शासकीय नियमांनुसार कोणत्याही निविदा न मागविता संस्थेने सर्व बाबी खरेदी केल्या आहेत. मोरे हे संस्थेचे अध्यक्ष असून त्यांनी लिहीलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्राच्या तीन हजार प्रती खरेदी करण्यात आल्या आहेत. हे कितपत उचित आहे, याविषयी शासनस्तरावर आक्षेप घेण्यात येत आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या सुमारे ५० हजार प्रती खरेदी करण्यासाठी बालभारतीला ६५ लाख रुपयांची अग्रीम (अ‍ॅडव्हान्स) रक्कम देण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार कोणत्याही खरेदीसाठी अग्रीम रक्कम देता येत नाही.

सचिव किशोर राजे निंबाळकर व अन्य अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत एकूण पुस्तक खरेदी किती आहे, ती कुठे ठेवण्यात आली आहेत व कोणाला दिली आहेत, याचा ताळमेळ लागलेला नाही. विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांना तयारीसाठी मार्गदर्शन यासह अन्य काही उद्दिष्टे संस्थेला ठरवून दिली असताना त्यात एक कोटी रुपयांची खरेदी बसते का, हाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

उच्चपदस्थांनी मात्र बालभारती या शासकीय संस्थेला अग्रीम रक्कम देण्यात काहीही गैर नाही. त्याचबरोबर सारथी ही स्वायत्त संस्था असल्याने तिला शासनाचे नियम लागू नाहीत. संचालक मंडळाच्या ठरावांनुसार कार्यवाही झालेली आहे व कोणताही गैरव्यवहार नाही, असे स्पष्ट केले.

‘खरेदी नियमानुसारच’

बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना थोर व्यक्तींच्या चरित्राची माहिती व्हावी, यासाठी केवळ प्रा. मोरे यांचीच नाही तर अन्य अनेक लेखकांचीही पुस्तके खरेदी करण्यात आली आहेत. हे काम संस्थेच्या उद्दिष्टांशी निगडितच आहे, असेही संबंधितांनी सांगितले. संस्थेचे माजी व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार यांनीही संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसून नियमानुसारच कामकाज केल्याचे स्पष्ट केले.

अग्रिम रक्कम बेकायदा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या सुमारे ५० हजार प्रती खरेदी करण्यासाठी बालभारतीला ६५ लाख रुपयांची अग्रिम रक्कम देण्यात आली आहे. नियमानुसार कोणत्याही खरेदीसाठी अग्रिम रक्कम देता येत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 3:54 am

Web Title: the book purchase by sarathi institute in pune fall in controversy zws 70
Next Stories
1 वातानुकूलित लोकलच्या उद्घाटनात मानापमान नाटय़
2 विकासक सुधाकर शेट्टी यांच्या घर, कार्यालयावर छापे
3 ‘लोकसत्ता वर्षवेध’ वाचकांच्या भेटीला 
Just Now!
X