राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी

सुट्टीचा दिवस असल्याने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) नवजात पेंग्विनला पाहण्याकरिता शुक्रवारी बच्चेकंपनीची चांगलीच गर्दी उसळली. ‘पिंगू’चे दर्शन घेण्याची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र दोन ते तीन महिने तरी पिंगूचे दर्शन होणार नसल्याचे समजल्याने त्यांचा हिरमोड झाला.

स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर जन्मलेला पिंगू पुढील दोन ते तीन महिने त्याचे आई -वडील मोल्ट आणि फ्लिपर यांच्यासोबतच असेल. त्यानंतरच ‘पिंगू’चे दर्शन मुंबईकरांना घेता येणार आहे. दरम्यान पर्यटकांना इतक्यात पिलाचे दर्शन घेता येणार नसल्याची माहिती देणारा फलक या ठिकाणी लावण्यात येणार आहे.

राणीबागेत हम्बोल्ट पेंग्विन दाखल झाल्याच्या दोन वर्षांनंतर बुधवारी, स्वातंत्र्यदिनी यातील एका जोडीला अपत्यप्राप्ती झाली. काळ्या कोटवाल्या दरबाऱ्यांच्या ताफ्यातील फ्लिपरने ५ जुलै रोजी दिलेल्या अंडय़ातून पिलाचा जन्म झाला. पिलाला पिसे येऊन पोहण्याची शारीरिक क्षमता निर्माण होण्यासाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच पेंग्विन कक्षामध्ये या पिलाला मुक्तसंचार करण्याकरिता सोडले जाईल,अशी माहिती राणीबाग प्रशासनाने गुरुवारी दिली होती. तसेच तीन महिन्यांनंतर त्याचे दर्शन होणार असल्याचे पालिकेने जाहीर केले होते. मात्र शुक्रवारी पिलूला बघण्याच्या उद्देशाने अनेक पर्यटकांनी राणीबागेला भेट दिली. शुक्रवारी पारसी नववर्षांनिमित्त सुट्टी असल्याने अनेकांनी मुलाबाळांसह राणीबागेत धाव घेतली.

पिलाला पाहण्यासाठी पेंग्विन कक्षात दाखल झालेले अनेक पालक आपल्या मुलांना उचलून पेंग्विनचे दर्शन घडवत होते. मात्र पिलू असलेल्या घरटय़ाभोवती लाकडी फळ्यांचे मार्गरोधक लावल्याने पिलूचे दर्शन पर्यटकांना होऊ शकले नाही. नाही म्हणायला लाकडी मार्गरोधकांमधून बाहेर पडणारा मोल्ट अधूनमधून दिसत होता. प्राणिसंग्रहालयात शुक्रवारी लहान बालकांना मोफत प्रवेश दिला जात असल्याने त्यांची नेमकी संख्या सांगत येणार नाही. मात्र तीन हजार प्रौढ आणि त्याहूनही अधिक बालकांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली, अशी माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. शिवाय पिलाचे दर्शन तीन महिन्यांनंतर होणार असल्याचे जाहीर करूनही अनेक  पर्यटक पिलाला पाहण्यासाठी येत असल्याने त्यासंबंधी फलक लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.