आजच्या महामुंबईचा विस्तार हा डहाणू ते माणगाव असा आहे. त्या मर्यादाक्षेत्र-निश्चितीमागे अनेक शतकांची ‘सांस्कृतिक स्मृती’ कशी काम करते ते आपण गेल्या भागात सविस्तर पाहिले. चिंचणीच्या ताम्रपत्रांमुळे संजान, डहाणू-चिंचणीचे महत्त्व मध्य युगामध्ये होते याचे पुरावेच सापडले. मात्र तज्ज्ञांना आणखी पुरातत्त्वीय पुरावे हवे होते तत्कालीन मानवी वस्तीचे ज्यामुळे चिंचणी आणि डहाणूची ऐतिहासिकता निसंशय सिद्ध होणार होती. यासाठीचा एक महत्त्वाचा पुरावा तज्ज्ञांना माहीत होता तो नाशिकच्या सुप्रसिद्ध बौद्ध लेणीतील लेणी क्रमांक १० च्या शिलालेखामध्ये आहे. त्यांत चिंचणी आणि डहाणूचा स्पष्ट उल्लेख येतो. क्षत्रप नाहपणाचा जावई ऋषभदत्त याने दिलेल्या दानाच्या संदर्भात हा उल्लेख आहे. त्यामुळे नाशिक आणि डहाणू-चिंचणीचा संबंधही जोडला गेला. हा व्यापारी मार्गच असावा, असे लक्षात आले होते. हा प्रदेश क्षत्रपांच्या ताब्यात होता, त्याचाच हा पुरावा होता.

२००६-०७ साली पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातर्फे डहाणू-चिंचणीमध्ये गवेषण हाती घेण्यात आले. त्याचप्रमाणे दोन प्रायोगिक उत्खननेही पार पडली. विश्वास गोगटे, श्रीकांत प्रधान, अभिजित दांडेकर, सचिन जोशी, शिवेंद्र काडगांवकर आणि सुरेश बोंबले यांचा यात सहभाग होता. डहाणू खाडीच्या उत्तर किनाऱ्यावर डहाणू, तर या खाडीच्या दक्षिण किनाऱ्यावर व चिंचणी-तारापूर खाडीच्या उत्तरेस चिंचणी वसलेले आहे. सुमारे २५ किलोमीटर लांबीचा असा हा किनारी पट्टा आहे. इथे चांदिगाव, आसनगाव आणि तानसी अशी पूर्व-ऐतिहासिक, उत्तर-ऐतिहासिक आणि मध्ययुगीन ठिकाणे निवडण्यात आली.

चिंचणीतील पूर्व-ऐतिहासिक पुरावे तेथील भंडार आळीमध्येच सापडले. काळी व लाल तुकतुकी असलेल्या भांडय़ांची खापरे सापडली. प्रामुख्याने डिश आणि बाऊल यांचीच ही खापरे होती. अशा प्रकारचे तिकोनीय किंवा शंकूच्या आकारासारखे बाऊल पिण्यासाठी सातवाहन कालखंडात वापरले जायचे. खासकरून गंगेच्या सुपीक पट्टय़ामध्ये सापडणाऱ्या मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या भांडय़ांची खापरेही इथे सापडली. अशाच प्रकारची खापरे नाशिकलाही सापडली असून ती इसवी सनपूर्व ५०० ते २०० या कालखंडातील असावीत, असा तज्ज्ञांचा अंदाज होता.  डहाणू-चिंचणी हे नाशिकला सर्वात जवळचे असे केवळ १०३ किलोमीटर लांब असलेले तत्कालीन मोठे बंदर होते. या बंदराहून नाशिकला पोहोचणारे दोन महत्त्वाचे व्यापारी मार्गही तज्ज्ञांनी नोंदवले. त्यांपैकी पहिला मार्ग हा जव्हार, खोडाळा, श्रीखिंडमार्गे  त्रिगलवाडी, पांडवलेणी करत नाशिक असा होता तर दुसरा मार्ग जव्हार-मोखाडा-खोडाळा, त्रिंबकेश्वर, महिरावणी आणि नाशिक असा होता. जव्हार येथे काही पुरावशेषही सापडले.

पूर्व मध्य युगातील सापडलेल्या अवशेषांमध्ये महत्त्वाची होती ती चित्रित भांडय़ांची खापरे. खास पर्शिअन बनावटीची ही भांडी भारतीय पुरातत्त्वीय स्थळांवर तुलनेने कमी सापडल्याची नोंद आहे. ही वैशिष्टय़पूर्ण खापरे ८ वे ते १२ वे शतक (शिलाहार) या कालखंडातील आहेत. चौल, संजान या ठिकाणी ही खापरे सापडली आहेत. तर जगभरात इतरत्र आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर त्याचप्रमाणे ओमान, श्रीलंका, मेसापोटामिया आणि पर्शिया या ठिकाणीही ही भांडी सापडली आहेत. ती चिंचणी-डहाणूला सापडणे हे जागतिक व्यापारी नातेसंबंध व बंदराचे महत्त्वही पुरते स्पष्ट करणारे होते.

चिंचणीच्या एका ताम्रपत्रामध्ये राष्ट्रकूट राजा इंद्र याने संयान म्हणजे संजानचा कारभार ताजिकच्या मधुमतीकडे दिल्याचा उल्लेख आहे. हा ताजिकिस्तानातून आलेला मुहमद होता, त्याचे मधुमती असे संस्कृत नामकरण करण्यात आले. त्यामुळे ९२६ साली भारत, पर्शिया, मध्य आशिया असा व्यापार मोठय़ा प्रमाणावर सुरू होता, याचेच पुरावे मिळतात. त्यात चिंचणी-डहाणूचा वाटा मोठा होता. सध्या डहाणू खाडीचा खूप मोठा भाग गाळाने भरलेला आहे असेही या गवेषणामध्ये लक्षात आले. नदीतून वाहत येणारी वाळू समुद्रात न जाता नदी किंवा खाडीमुखाशीच अडकून राहिल्याने खाडी आता गाळाने भरलेली आहे.

चिंचणी-वरोर खाडीच्या परिसरामध्ये मानवी वस्तीचे आणखी काही अवशेष सापडले त्यात निळ्या, हिरव्या आणि करडय़ा रंगाची भांडी (मोनोक्रोम वेअर) त्यांचे अवशेष होते त्याचप्रमाणे पांढऱ्यावर निळ्या रंगात नक्षीकाम केलेल्या चिनी भांडय़ांचे अवशेषही सापडले. खासकरून आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर या भांडय़ांचे अवशेष मोठय़ा प्रमाणावर सापडतात. चौलमध्ये यापूर्वी सलग मानवी वस्तीचे अवशेष सापडले तर चिंचणी-डहाणू परिसरात ते सर्वत्र विखुरलेल्या अवस्थेत आहेत, असे लक्षात आले. मौर्यकालीन अवशेष भंडार आळीत सापडले. या परिसरात आणखी काही विस्तारित उत्खनने केली तर मौर्यपूर्व कालखंडातही हे बंदर अस्तित्वात होते का, याचे पुरावे सापडतील , अशी नोंद या अहवालामध्ये तज्ज्ञांनी केली आहे. याच बरोबर मुहम्मद अल्लाउद्दीन मुहम्मद खिल्जी (इ.स. १२९६ ते १३१६), नसिरुद्दीन मोहम्मद शहा पहिला (गुजरातचा सुल्तान इ.स. १४५८ ते १५११) याची चांदीची व तांब्याची नाणी इथेच एका शेतकऱ्याला सापडली होती, त्याची नोंदही या गवेषणामध्ये करण्यात आली.

कार्ले, कान्हेरी आणि नाशिक येथील शिलालेखांमध्ये उल्लेख करण्यात आलेले धेनूकाकट म्हणजे डहाणू असण्याची शक्यता या अहवालाअखेरीस व्यक्त करण्यात आली आहे. विद्यमान महामुंबईतील डहाणू-चिंचणी हा पट्टा असा एका बाजूने मुंबईशी तर दुसरीकडे नाशिकशी जोडलेला आहे. त्यातही मुंबईशी जुळलेली नाळ थेट आहे, त्यासाठी कोणताही घाटमाथा पार करावा लागत नाही. शिवाय समुद्रकिनारा सलग आहे. म्हणूनच महामुंबईच्या अस्तित्वात याचे मर्यादाक्षेत्र एका बाजूस डहाणूपर्यंत मागे जाते.

(यातील धेनूकाकटच्या उल्लेखाविषयी सविस्तर नोंदी पुढील भागात.)

vinayak.parab@expressindia.com

@vinayakparab