खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये अविरत सेवा

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : करोनाच्या उद्रेकामध्ये जिथे खासगी दवाखान्यांनी दरवाजे बंद केले आहेत, तेथे फिजिशियन डॉ. दीपक बैद आणि फुप्फुसविकारतज्ज्ञ डॉ. चेतन जैन आणि डॉ. कुमार दोषी हे तीन खासगी सेवा देणारे करोनायोद्धा स्वत:हून पुढाकार पूर्णपणे मोफत सेवा देत घाटकोपरच्या पालिके च्या राजावाडी रुग्णालयाची धुरा प्रशासनाच्या बरोबरीने सांभाळत आहेत. येथील करोना कक्ष उभा करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे.

राजावाडीत मध्यम आणि सौम्य लक्षणे असलेले रुग्ण दाखल केले जातात. यात ६० वर्षांवरील किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब असे इतर आजार असलेले रुग्ण आहेत. सुरुवातीला भीतीपोटी या विभागात आरोग्य कर्मचारी पाय ठेवण्यासही तयार नव्हते. योग्य काळजी घेत उपचार देणे शक्य असल्याचे समुपदेशन के ले. त्यानंतर सर्व जण आपली जबाबदारी उचलण्यासाठी पुढे आले, असा अनुभव डॉ. चेतन यांनी सांगितला. इथले बरेचसे रुग्ण उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत; परंतु काही रुग्णांचे निदान उशिरा झाल्याने किंवा संसर्ग प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झाल्याने त्यांची प्रकृती खालावत जाते. अतिदक्षता विभाग नसल्याने अशा रुग्णांना नायर किंवा सेव्हनहिल्सला पाठवावे लागते, असे डॉ. चेतन सांगतात.

डॉ. चेतन शुश्रूषा, हिंदू सभा या रुग्णालयांमध्येही करोनाबाधितांवर उपचार करतात. तिन्ही रुग्णालयांत सेवा देऊन थकायला होत नाही का, या प्रश्नावर ही आमची सामाजिक जबाबदारी आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही ती घ्यायला हवी, असे उत्तर ते देतात.

सरकारी रुग्णालयातील कामाच्या अनुभवाबाबत डॉ. कुमार सांगतात, ‘मनुष्यबळ, यंत्रणा अशा अनेक अडचणी दररोज येत असतात; परंतु त्यावर मात करत आमचा रुग्णांना सेवा देण्यावर भर असतो. रुग्णाला थोडे बरे वाटल्यानंतर येथून अलगीकरण केंद्रामध्ये पाठविले जाते. सरकारी रुग्णालय असूनही रुग्णांना येथून अलगीकरण केंद्रामध्ये जायचे नसते. तेथूनही अनेकदा रुग्ण आम्हाला परत रुग्णालयात घेण्यासाठी विनंती करतात, हीच आमच्या कामाची पावती आहे.’ के. जे. सोमैय्या रुग्णालयातही सेवा देत असल्याने येथे दररोज येणे जमत नाही; परंतु व्हॉटसअपमधून, फोनच्या माध्यमातून रुग्णांबाबत चर्चा करणे, त्यांची उपचार पद्धती ठरविण्याचे काम सुरू असते. आता इथले निवासी डॉक्टर औषधशास्त्र विषयाचे नसले तरी रुग्ण हाताळण्यासाठी शिकले आहेत, असे डॉ. कुमार सांगतात. गंभीर प्रकृतीच्या रुग्णांना खाट उपलब्ध करून देण्यात अडचणी येत असल्याने खाटांची माहिती केंद्रीय पद्धतीने उपलब्ध झाल्यास तातडीने हलविणे सोपे जाईल, असे मत डॉक्टरांनी मांडले.

व्यवस्थापन असे..

’ डॉ. बैद राजावाडीत दाखल झाले त्या वेळी रुग्णालयात नुकत्याच २० खाटा सुरू झाल्या होत्या. १०० पर्यंत वाढविण्याची तयारी सुरू होती. निवासी डॉक्टर असले तरी औषधशास्त्र विषयातील तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांवर उपचार करण्याबाबत मार्गदर्शनाची नितांत गरज होती. कमीत कमी संसर्ग प्रसार होईल यासाठी रुग्ण दाखल कोठून होणार, कोणत्या वॉर्डमध्ये जाणार, कोठून बाहेर जाणार, जेणेकरून संसर्ग कमी होईल, याची नियमावली त्यांनी तयार केली.

’ आवश्यक सर्व संसाधने गोळा करण्यापासून कामाची रचना, पद्धती, मनुष्यबळ याचा सर्वागीण विचार करून रोज बदल करत गेलो. रुग्णांची संख्या वाढत गेली तशी आता १०० खाटाही अपुऱ्या पडत आहेत. आता वॉर्डच्या मधल्या भागातही काही खाटा लावण्यात आल्या आहेत. उपलब्ध व्यवस्थेत जमेल तितके अधिक रुग्ण सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. बैद सांगतात.

एकीकडे पालिका दीड ते दोन लाख वेतन देऊन सेवा देण्यासाठी बोलावत असूनही कोणी यायला तयार नाही. मात्र या तिन्ही डॉक्टरांनी मोफत सेवा देत अनेक रुग्णांचे प्राण वाचविले आहेत.

– डॉ. विद्या ठाकूर, अधीक्षक, राजावाडी रुग्णालय