संपूर्ण राज्यात मुसळधार वृष्टी होत असली तरी मुंबई परिसराला पाणीपुरवठा करणारी ठाणे व नाशिक येथील धरणे मात्र अजूनही तहानलेलीच आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये उणेपुरे तीन मिलीमीटर पाऊस पडला आहे.

तलावक्षेत्रातील पाणीसाठय़ात वाढ झालेली नसून पाणीकपातीची टांगती तलवार कायम राहील. शुक्रवारी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या २४ तासात तुळशी तलावात अवघा दोन मिमी तर भातसामध्ये एक मिमी पावसाची नोंद झाली. या व्यतिरिक्त कोणत्याही तलावात पावसाचे थेंब पडलेले नाहीत. आजमितीला सर्व तलावातील एकूण पाणीसाठा ९ लाख ९४ हजार दशलक्ष लिटर आहे. गेल्या वर्षी या वेळी तलावात १४ लाख २८ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा होता.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी सर्वात लहान तलाव म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी तलाव. साधारणपणे जुलै महिन्यात हे तलाव भरून वाहू लागते. अवघे ८ हजार दशलक्ष लिटर क्षमतेचे (मुंबईला दररोज पावणेचार हजार दशलक्ष लिटर पाणी लागते ) हे तलाव सप्टेंबर महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू होऊनही भरलेले नाही. सध्या या तलावात ७८०० दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. भातसा हे सात लाख दशलक्ष लिटरहून अधिक क्षमतेच्या धरणात आज साडेचार लाख दशलक्ष लिटर पाणी आहे.