टिटवाळ्यात तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आणि तिच्या प्रियकराची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली आहे. संजय नरावडे (वय ३०) असे त्याचे नाव असून तो दररोज पॉर्न साईट बघायचा, अशी माहिती समोर येत आहेत.
टिटवाळा येथील नालिंबी गावाच्या परिसरात गेल्या आठवड्यात सोमवारी निर्जन स्थळी फिरायला गेलेल्या प्रेमी युगुलावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. या अज्ञात व्यक्तीने तरूणाची हत्या करून तरूणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणात पाच तपास पथके तयार केली होती. एकूण ४५ पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. नराधमाने पीडित तरुणीचा मोबाईल चोरला होता. पोलिसांनी या मोबाईलचा शोध घ्यायला सुरुवात केली. तसेच आरोपीचे रेखाचित्रही तयार करण्यात आले होते. या आधारे पोलिसांनी आरोपीला उल्हासनगरमधील एका लॉजमधून अटक केली.
संजय नरावडे असे नराधमाचे नाव असून त्याच्याकडून एक रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये औरंगाबादमधून त्याने १५ हजार रुपयांमध्ये रिव्हॉल्वर खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आली. संजयला पॉर्न बघायची सवय होती. पीडित मुलगी आणि तिचा प्रियकर तिथून जात असताना संजय पॉर्नच बघत होता. त्या प्रेमीयुगूलाला बघताच संजयच्या डोक्यात चोरीचा विचार आला. पीडित तरुणीच्या प्रियकराने दुचाकी बाजूला थांबवली आणि तो लघूशंकेसाठी झाडाझुडपात गेला. याच दरम्यान संजयने त्यांना गाठले. त्याने पीडित तरुणीला धमकी दाखवत पैशांची मागणी केली. काही वेळातच प्रियकर तिथे पोहोचला असता त्याने संजयला विरोध केला. संजयने रिव्हॉल्वरने त्याच्यावर गोळी झाडली आणि मग पीडित तरुणीला झाडाझुडपात नेत तिच्यावर बलात्कार केला. संजयने यापूर्वी देखील एका तरुणावर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे.
अंबरनाथवरुन नालिंबीमार्गे टिटवाळ्याला जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा घनदाट जंगल आहे. या मार्गावर फारशी वर्दळ नसते. त्यामुळे अनेक प्रेमीयुगूल या भागात येत असतात. अशा प्रेमी युगूलांना संजयने यापूर्वीही लक्ष्य केले होता का याचा तपास आता सुरु आहे. असा प्रकार घडला असेल तर संबंधितांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 12, 2018 11:31 am