राज्यातील विविध टोलनाक्यांच्या पाच किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्यांच्या वाहनांना पथकरात सवलत मिळत असली तरी मुंबईतील टोलनाक्यांच्या परिसरात राहणाऱ्यांना या सवलतीपासून वंचितच राहावे लागणार आहे. ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या प्रकल्पांना ही सवलत लागू नसल्याकडे लक्ष वेधत मुंबईतील टोलवसुली करणाऱ्या  ‘मुंबई एण्ट्रीपॉइण्ट लिमिटेड’ने (‘एमईपीएल’) ही सवलत देणे फेटाळले आहे.
टोलनाक्यापासून पाच किलोमीटरच्या त्रिज्येच्या परिसरात राहणाऱ्यांना एकेरी पथकराच्या १० पट किमतीत मासिक पासची सुविधा देण्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर मुंबईतील टोलनाक्यांसाठी अशाप्रकारची सवलत देण्यास ‘एमईपीएल’ने नकार दिला आहे.
पथकर धोरणातील तरतुदींनुसार ४०० कोटींपेक्षा अधिक रकमेचे प्रकल्प, राज्य रस्ते विकास महामंडळाने राबवलेले प्रकल्प यांना पाच किलोमीटरच्या त्रिज्येचा नियम लागू होत नाही. तसेच २०२७ पर्यंत मुंबईतील टोलनाक्यांवरील पथकर वसुलीचे काम कंपनीला मिळाले आहे, त्यावर न्यायालयाचे शिक्कामोर्तबही झाले आहे. त्यामुळे मुंबईतील टोलनाक्यांवरील पथकराच्या वसुलीत पाच किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या मासिक पाससाठी सवलत देण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका कंपनीने मांडली आहे.