अंधेरीतील घटना;चालक फरार

मुंबई : मेट्रो प्रकल्पाचे साहित्य वाहून नेण्यासाठी वापर होणाऱ्या ट्रेलरच्या (एक्सेल पुलर) धडकेत एका तरुणीचा मृत्यू झाला, तर अन्य तरुणी जखमी झाली. शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास घडलेल्या या अपघातात रस्त्याकडेला उभ्या रिक्षा आणि टॅक्सीचेही नुकसान झाले.

अपघातग्रस्त ट्रेलर पश्चिम द्रुतगती मार्गावरून दादरच्या दिशेने जात होता. अंधेरी परिसरातील गुंदवली बेस्ट थांब्याजवळ ट्रेलरपासून चालक बसतो तो भाग (पुलर) निखळला. अनियंत्रित धावणाऱ्या पुलरखाली बेस्ट थांब्याजवळ उभ्या फाल्गुनी पटेल (२६) यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या तुलसी पटेल (३२) या अपघातात किरकोळ जखमी झाल्या.

या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा नोंदवला. अपघातानंतर चालक पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे, असे अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय बेलगे यांनी सांगितले. अपघातग्रस्त तरुणी चुलत बहिणी होत्या. त्या चांदिवली परिसरात रहिवासी होत्या.

तपासासाठी समिती..

’ अपघात घडला तेव्हा हा ट्रेलर एमएमआरडीएअंतर्गत सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाशी निगडित काम करत नव्हता. अंधेरी ते दहिसर या मेट्रो २ए प्रकल्प स्थळावरून परतत होता. तांत्रिक बिघाडामुळे घडलेल्या या अपघाताची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच सखोल तपासासाठी तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली असून अहवाल दोन दिवसात अपेक्षित आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या प्रवक्त्याने दिली.

’ या अपघातात मेट्रोच्या खांबाचे नुकसान झाले असून संबंधित कंत्राटदार आणि ट्रेलर मालकाविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.