काँग्रेस कार्यकर्ता मनोज दुबे हत्या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे जितेंद्र मिश्रा आणि उमेश ठाकूर अशी आहेत. साकीनाका पोलिसांना तपास करत दोघा मुख्य आरोपींना अटक केली आहे. फेसबुक पोस्टच्या वादातून घाटकोपरच्या असल्फा भागातील काँग्रेस कार्यकर्ता मनोज दुबे यांची तलवार आणि चाकूने प्राणघातक वार करुन हत्या करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण ?
फेसबुक पोस्टच्या वादातून घाटकोपरच्या असल्फा भागातील काँग्रेस कार्यकर्ते मनोज दुबे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मनोज दुबे यांच्यावर तलवार आणि चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या मनोज दुबे यांना तात्काळ नजीकच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यासंबंधी केलेल्या पोस्टवरुन हा वाद सुरु झाला होता. एका युवकाने काँग्रेस आमदार नसीम खान यांच्यावर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. मनोज दुबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पोस्टवरुन टीका करणाऱ्याला समजावले. पण वाद निवळण्याऐवजी आणखी वाढला. याच वादातून रात्री अडीचच्या सुमारास मनोज दुबे यांच्यावर तलवारी आणि चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला.