२९ सप्टेंबरपासून औरंगाबाद येथून सुरुवात * आठ केंद्रांवर ४ ऑक्टोबपर्यंत प्राथमिक फेरी
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची उत्सुकता आता फक्त दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रातील विविध आठ केंद्रांवर होणाऱ्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. २९ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथून स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात होणार असून राज्यभरातील आठ विविध केंद्रांवर ४ ऑक्टोबपर्यंत प्राथमिक फेरी रंगणार आहे.
स्पर्धेसाठी राज्यभरातील तब्बल १३० महाविद्यालयांनी आपले अर्ज सादर केले असून यंदाच्या वर्षी तब्बल १३० नवीन विषयांवरील एकांकिका लिहिल्या गेल्या आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि नागपूर या आठ केंद्रांवर होणाऱ्या या स्पर्धेमुळे राज्यभरातील नाटय़वेडय़ा तरुणांना व्यासपीठ मिळणार आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस आणि ‘केसरी’ यांच्या सहकार्याने होणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा राज्यभरात आयोजित करण्यासाठी ‘अस्तित्व’ या संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी यंदा रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफएम, तर संपूर्ण स्पर्धेसाठी टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’ काम पाहणार आहेत. त्याशिवाय या स्पर्धेत तावून सुलाखून निघणाऱ्या कलाकारांना पुढील संधी देण्यासाठी आयरिस प्रॉडक्शन टॅलेण्ट पार्टनर म्हणून काम पाहतील. नॉलेज पार्टनर म्हणून स्टडी सर्कल सहभागी झाले आहेत.
स्पर्धेत सहभागी झालेल्या १३० महाविद्यालयांपैकी अव्वल आठ महाविद्यालयांच्या एकांकिका महाअंतिम फेरीसाठी निवडल्या जातील आणि त्यातून महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ ठरणार आहे. indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika2015 या संकेतस्थळावर स्पर्धेचे वेळापत्रक, नियम व अटी आणि इतर माहिती उपलब्ध आहे.