सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस सर्वाधिक लाचखोर असे म्हटले जाते. पण, लाचखोरीला लाथाडून लाच देणाऱ्यांनाच पकडून देण्याची कौतुकास्पद कामगिरी गोरेगावमधील एका साहाय्यक पोलीस निरीक्षकाने केली आहे. गुन्हा रद्द करण्यासाठी पसे देऊ करत असलेल्या दोघांची तक्रार स्वत पोलिसाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन केली आणि अभावानेच घडणाऱ्या उलट सापळ्यात दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
गुजरातहून गुटख्याने भरलेला ट्रक मुंबईत येणार असल्याची खबर गोरेगाव पोलिसांना मार्च महिन्यात मिळाली. त्यानुसार, ४ मार्च रोजी पोलिसांनी गोरेगाव पश्चिम येथील ग्रँड सरोवर हॉटेलजवळ गस्त घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी मिळालेल्या खबरीशी मिळताजुळता ट्रक दिसल्यानंतर गोरेगाव पोलिसांनी छापा टाकून ट्रकचालक आणि क्लीनर यांना ताब्यात घेतले. ट्रकच्या तपासणीत तब्बल १ हजार ६१५.६८ किलोग्रॅम गुटख्याचा साठा सापडला. बाजारात त्याची किंमत एक कोटी रुपये इतकी होती. छाप्यात पोलिसांनी ट्रकचालक लुकमान मदारा (२६) आणि क्लीनर मोहम्मद हुसेन खोटा (२२) याला अटक केली. या गुन्ह्य़ाचा तपास पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक सानप यांच्याकडे देण्यात आला होता.
मात्र, या दोन्ही आरोपींशी संबंधित व्यक्ती सातत्याने सानप यांच्याशी संपर्क साधत होते. आमच्या सहकाऱ्यांना सोडा, गुन्हा रद्द करा, तुम्हाला त्याची किंमत देतो, अशा प्रकारे सानप यांना प्रलोभने दाखविण्याचा प्रयत्न करत होते. सानप मात्र त्याला बळी पडले नाहीत. १० ते १२ दिवस हा प्रकार सुरू असल्याने वैतागलेल्या सानप यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुख्यालय गाठले. मुख्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांनी घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला.
अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत त्याच दिवशी रात्री त्याची खातरजमा केली. लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बुधवारी ५० हजार रुपये घेऊन गोरेगाव पोलीस ठाण्यासमोर मिडास हॉटेलजवळ बोलावले. लुकमान खत्री आणि मुदस्सर खत्री हे दोघेही पसे घेऊन सानप यांना देण्याचा प्रयत्न करत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना रंगेहाथ पकडले.
सानप यांच्या या कामगिरीचे पोलीस ठाणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे. कोणतीही व्यक्ती लाच देण्याचा प्रयत्न करत असेल तर थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.