एक लाख ६५ हजार दंड वसूल

वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा, वाहतुकीचे नियमन योग्य पद्धतीने व्हावे या उद्देशाने पालिकेने मुंबईमधील पाच मोठय़ा रस्त्यांवर वाहने उभी करण्यास मनाई करीत कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सलग दुसऱ्या दिवशी या रस्त्यांवर बेकायदा उभ्या केलेल्या तीन दुचाकी आणि १४ चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून या वाहनमालकांकडून एक लाख ६५ हजार दंड वसूल करण्यात आला.

पालिकेने महर्षी कर्वे मार्ग, गोखले रोड (उत्तर), एस. व्ही. रोड, न्यू लिंक रोड आणि एल. बी. एस. मार्ग या पाच मार्गावरील काही टापूमध्ये होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्यास मनाई केली आहे. मनाई केलेल्या भागात वाहने उभी केल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पालिकेने कंत्राटदारांची नेमणूक केली असून लष्करातून निवृत्त झालेल्या जवानांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेने शुक्रवारपासून ही कारवाई सुरू केली आहे.

शनिवारीही ही कारवाई सुरू होती. या पाचही  रस्त्यांवर बेकायदा उभ्या केलेल्या तीन दुचाकी, १४ चारचाकी गाडय़ावर कारवाई करण्यात आली. दुचाकीस्वारांनी दंडाची रक्कम भरून आपली वाहने सोडवून नेली. तर शुक्रवार आणि शनिवारी पालिकेने ताब्यात घेतलेल्या १५ चारचाकी वाहनांच्या मालकांनी दंड भरला. त्यामुळे ही १५ वाहने सोडण्यात आली. तीन दुचाकीस्वारांकडून १५ हजार रुपये, तर १५ चारचाकी  वाहन मालकांकडून  एक लाख ५० हजार असा एकूण १ लाख ६५ हजार रुपयांचा दंड पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे. पालिकेने शुक्रवारपासून केलेल्या कारवाईतील पाच दुचाकी आणि १७ चारचाकी अशी २२ वाहने अद्याप पालिकेच्या ताब्यात आहेत. दंड भरल्यानंतर ही वाहने सोडून देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.